एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ई&टीसी विभागाचा त्रिदिवसीय व्हॅल्यू अॅडिशन प्रोग्राम उत्साहात संपन्न
पंढरपूर (कोर्टी), प्रतिनिधी :
एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी (ता. पंढरपूर) येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी विभागामार्फत तसेच इन्स्टिट्यूशन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअर्स (IETE) यांच्या सहयोगाने द्वितीय वर्ष बी.टेक. (ई&टीसी) विद्यार्थ्यांसाठी "Practical Skills in Electronic Components, Testing and Electronic Measurement Instruments" या विषयावरील त्रिदिवसीय व्हॅल्यू अॅडिशन प्रोग्राम (VAP) दि. २८ ते ३० जुलै २०२६ या कालावधीत उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडला.
अभियांत्रिकी शिक्षणामध्ये प्रयोगाधारित अध्ययनाला चालना देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना विविध इलेक्ट्रॉनिक घटकांची ओळख, त्यांची चाचणी, इलेक्ट्रॉनिक मापन उपकरणांचा वापर तसेच मल्टीमीटर, सीआरओ (CRO), डीएसओ (DSO), फंक्शन जनरेटर आदी उपकरणांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक देण्यात आले. तसेच सिग्नल विश्लेषण, मोजमाप तंत्र आणि प्रयोगशाळेतील उपकरणांचा सुरक्षित व प्रभावी वापर याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान प्रत्येक विद्यार्थ्याला उपकरणे प्रत्यक्ष हाताळण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या तांत्रिक संकल्पना अधिक स्पष्ट झाल्या असून त्यांच्या प्रयोगशाळेतील कौशल्यांमध्ये, समस्या सोडविण्याच्या क्षमतेमध्ये आणि उद्योगाभिमुख ज्ञानामध्ये लक्षणीय वाढ झाली. विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रत्यक्ष प्रयोगांमधून मौल्यवान अनुभव मिळविला. या व्हॅल्यू अॅडिशन प्रोग्राममध्ये ६५ हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. अविनाश हराळे यांनी नियोजन व आयोजन केले. विभागप्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी तसेच प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी कार्यक्रमासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी अशा कौशल्यवर्धक उपक्रमांचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
हा व्हॅल्यू अॅडिशन प्रोग्राम विद्यार्थ्यांच्या तांत्रिक ज्ञानात भर घालणारा, प्रयोगशाळेतील आत्मविश्वास वाढविणारा आणि उद्योगाभिमुख कौशल्ये विकसित करणारा ठरल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

