स्वेरीमध्ये स्पर्धा परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन सत्र संपन्न स्वेरीचे माजी विद्यार्थी मिनाक्षी रोंगे, शुभम शिंदे आणि तेजश्री लेंडवे यांनी दिला कानमंत्र


स्वेरीमध्ये स्पर्धा परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन सत्र संपन्न

स्वेरीचे माजी विद्यार्थी मिनाक्षी रोंगे, शुभम शिंदे आणि तेजश्री लेंडवे यांनी दिला कानमंत्र



पंढरपूर: गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे ऑटोनॉमस (स्वायत्त) दर्जा प्राप्त महाविद्यालय असून हे महाविद्यालय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरशी संलग्न आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार तंत्रशिक्षण, संशोधन व कौशल्यविकास यांचा त्रिवेणी संगम साधणारे अग्रगण्य अभियांत्रिकी महाविद्यालय असून यामध्ये विविध शैक्षणिक उपक्रम, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धात्मक सहभाग, उद्योग क्षेत्राशी सशक्त सहकार्य तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभावी योजना नियमित राबविल्या जातात. यामुळे महाराष्ट्रातील आघाडीच्या अभियांत्रिकी शैक्षणिक संस्थांपैकी एक म्हणून राज्यभर याची स्वतंत्र निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अंतर्गत असलेल्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभागामार्फत दि. ३१ मे २०२५ रोजी अंतिम वर्ष व पदवीपूर्व विद्यार्थ्यांसाठी ‘प्लॅन, प्रिपेअर, परफॉर्म: अ रोड मॅप फॉर अस्पायरिंग सिव्हिल इंजिनिअर्स’ या विषयावर अत्यंत उपयुक्त व प्रेरणादायी अशा करिअर मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये स्वेरीचे माजी विद्यार्थी असलेले आणि सध्या प्रशासकीय सेवेत योगदान देत असलेले अधिकारी मिनाक्षी रोंगे, शुभम शिंदे आणि तेजश्री लेंडवे यांनी स्पर्धा परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले.

               स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस)चे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या दिशादर्शक मार्गदर्शनाखाली, कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम. पवार यांच्या सहकार्याने व उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली आयोजिलेल्या ‘स्पर्धा परीक्षेत करिअर करण्याविषयी मार्गदर्शन’ या सत्राच्या उदघाटनानंतर प्रा. सी. आर. लिमकर यांनी स्वागत करून मार्गदर्शन सत्र आयोजित करण्याचा हेतू स्पष्ट केला. २०१७ बॅच मधून उत्तीर्ण असलेल्या स्वेरीच्या माजी विद्यार्थीनी मिनाक्षी महादेव रोंगे ह्या सध्या जलसंपदा विभागात सहाय्यक कार्यकारी अभियंता म्हणून काम पाहत आहेत. त्यांनी एमपीएससीच्या एमईएस -२०२३ या स्पर्धा परीक्षेत ८९ वा क्रमांक मिळविला असून त्यांनी ‘स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी हे सांगून अभ्यासाची दिशा आणि अशा वेळी आपली मानसिकता कशी असावी? यावर बहुमोल मार्गदर्शन केले. तसेच २०२१ साली स्वेरीच्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातून उत्तीर्ण झालेले शुभम हरी शिंदे यांनी एमपीएससीच्या एमईएस -२०२३ या परीक्षेत १६ वा क्रमांक मिळविला असून उच्च तंत्रशिक्षण घेण्यासाठी अत्यंत अवघड असणारी गेट परीक्षा २ वेळा उत्तीर्ण झाले आहेत. त्यांनी पुढे आयआयटी, मुंबई मधून बांधकाम व्यवस्थापन पदविका घेतली. पुढे त्यांनी स्वेरीतील प्राणायाम, मार्गदर्शन सत्रे, गेट क्लासेस व फिल्ड व्हिजिट्स यामुळे त्यांचा अभ्यास कसा प्रभावी झाला हे सविस्तर स्पष्ट केले तसेच २०२२ साली स्वेरीच्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातून उत्तीर्ण झालेल्या तेजश्री भारत लेंडवे यांनी एमपीएससी च्या एमईएस -२०२३ या परीक्षेत महिला गटात दुसरा क्रमांक मिळविला तर दोन वेळा गेट परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. सध्या तेजश्री लेंडवे ह्या जलसंपदा विभागात सहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या महाविद्यालयीन काळातील शिक्षकांचे मार्गदर्शन, प्रोत्साहन व मार्गदर्शक संवाद याच्या योगदानामुळे आपण स्पर्धा परीक्षेत यशस्वी होत असल्याचे सांगून स्पर्धा परीक्षेची तयारी करताना नेमके कोणत्या विषयावर फोकस केला पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेबाबत प्रश्न विचारले. यावर मिनाक्षी रोंगे, शुभम शिंदे आणि तेजश्री लेंडवे यांनी समाधानकारक व अभ्यासपूर्ण उत्तरे दिली. या मार्गदर्शन सत्रात विशेष अतिथी म्हणून मुंबई मधील फोसरॉक केमिकल्स कंपनीचे संशोधन आणि विकास विभागाचे राम पंत यांनीही मार्गदर्शन करताना म्हणाले की, 'उत्तम अभियंता होण्यासाठी सर्वप्रथम चांगला माणूस होणे आवश्यक आहे. चांगला माणूस बनण्यासाठी समोरच्या माणसाची भावनिकता, मानसिकता परिस्थिती यांचा अभ्यास करून त्यावर चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करता येवू शकते. यासाठी अभियंता होण्यापूर्वी माणूस बनणे महत्वाचे आहे. असे सांगून त्यांनी सहकार क्षेत्रात आपले कसे वर्तन असावे’ यावर सुंदर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. पी. व्ही. केळकर यांनी काम पाहिले. यावेळी सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ. एस. पी. पाटील, डॉ. एम.जी. देशमुख, प्रा. पूजा रोंगे यांच्यासह सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad