सिंहगड महाविद्यालयाच्या ११ विद्यार्थ्यांची एकाचवेळी कॅपजेमिनीत निवड
सोलापूर : केगाव येथील एन बी नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाने 'थिंक प्लेसमेंट ... थिंक सिंहगड ' या सूत्रानुसार ट्रेनिंग ॲन्ड प्लेसमेंटची परंपरा अबाधित ठेवली आहे.
शुक्रवारी, २५ एप्रिल रोजी एकाचवेळी तब्बल ११ विद्यार्थ्यांची कॅपजेमिनी या नामांकित कंपनीत निवड झाली आहे. २०२४-२०२५ वर्षात ७४ विद्यार्थ्यांची विविध नामांकित कंपनीत चांगल्या वेतनावर प्लेसमेंटमध्ये निवड झाली आहे. ९२ विद्यार्थ्यांची इंटर्नशीपसाठी निवड झाली आहे. जवळपास ८१ नामांकित कंपन्यांनी महाविद्यालय कॅम्पसला भेट दिल्याचे प्राचार्य डॉ. शंकर नवले यांनी सांगितले.
कॅपजेमिनी ही तंत्रज्ञानाचा वापर करून कंपन्यांसोबत भागीदारी करून त्यांच्या व्यवसायात परिवर्तन घडवून आणण्यात कॅपजेमिनी ही जागतिक स्तरावर आघाडीवरची कंपनी आहे. अशा कंपनीत एकाचवेळी इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी आणि काम्प्युटर सायन्स अभियांत्रिकी विभागातील विशाखा घनवट, साक्षी तदलागी, आदिबा काझी, तेजस्विनी देशमुख , सुरती ठोकळ, आश्लेषा शिंदे, प्रेरणा देशमुख, पल्लवी पेगड्याल, श्वेता कोंढारे , प्रतीक्षा कुलकर्णी, निकिता जगदाळे या ११ विद्यार्थ्यांची कॅपजेमिनी कंपनीत निवड झाल्याचे ट्रेनिंग ॲन्ड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. विकास मराठे यांनी सांगितले.
नुकत्याच झालेल्या प्रथम वर्षाच्या पालक सभेत संस्थेचे सहसचिव तथा कॅम्पस डायरेक्टर संजय नवले यांनी विद्यार्थ्यांच्या ट्रेनिंग ॲन्ड प्लेसमेंटच्या आकडेवारीवर प्रकाश टाकीत विद्यार्थ्यांसह विभागाचे कौतुक केले. संशोधन आणि मूल्य आधारित शिक्षणाद्वारे समाजाच्या भल्यासाठी सक्षम तंत्रज्ञांची निर्मिती करणे या दृष्टीने कामकाज चालू आहे.
करिअरच्या संधी वाढविण्यासाठी प्रकल्प आधारित शिक्षणाद्वारे कल्पना, नवकल्पना यांना प्रोत्साहन देऊन अत्याधुनिक शैक्षणिक आणि संशोधन वातावरण विकसित करणे आणि व्यावसायिक आचारसंहितेद्वारे उच्च आणि नैतिक मूल्ये रुजवणे या ध्येयाने संस्थेचे कार्य चालू असल्याचे संस्था सहसचिव संजय नवले यांनी सांगितले.
या यशाबद्दल उपप्राचार्य डॉ. शेखर जगदे, उपप्राचार्य डॉ. रवींद्र व्यवहारे, डॉ. प्रदीप तपकीरे, प्रा. एच. टी. गुरमे, प्रा. विजय बिरादार यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


