स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्रा. दिग्विजय रोंगे यांना पीएच.डी. प्राप्त
पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयुट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) च्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात सहाय्यक प्राध्यापक असलेले प्रा.दिग्विजय दादासाहेब रोंगे यांना नुकतीच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठ, सोलापूरमधून अभियांत्रिकी मधील मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विभागात ‘ऑप्टिमल डिझाईन ऑफ मायक्रोकॉम्पोनन्ट्स फॉर मायक्रोफ्लुईडीक अॅप्लिकेशन्स' या विषयात पीएच.डी. प्रदान करण्यात आली. त्यांनी आपला शोध निबंध पु.अ.हो. सोलापूर विद्यापीठामध्ये सादर केला होता. त्यांच्या या यशाबद्धल सर्वत्र कौतुक होत आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या प्रेरणेने प्रा. दिग्विजय रोंगे यांनी पीएच.डी. पूर्ण केली. प्रा. दिग्विजय रोंगे यांनी मायक्रोफ्लुइडिक्स क्षेत्रात महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. ज्यामध्ये मायक्रोफ्लुइडिक उपकरणांची कार्यक्षमता आणि अचूकता सुधारण्यासाठी मायक्रो कंपोनंट्सचे ऑप्टिमायझेशन करण्यावर भर देण्यात आला आहे. या संशोधनात पारंपरिक सांख्यिकीय पद्धती आणि प्रगत इव्होल्यूशनरी पद्धतींचा वापर करून योग्य डिझाइन आणि ऑपरेशनल पॅरामीटर्सची ओळख करून दिली आहे. मायक्रोस्केल फिजिक्सचा अभ्यास करण्यासाठी सिम्युलेशन्सचा वापर करण्यात आला, तर फोटोलिथोग्राफी आणि वायर-ईडीएम सारख्या अचूक तंत्रज्ञानाचा वापर करून ऑप्टिमाइझ्ड कंपोनेंट्स तयार करण्यात आले. प्रायोगिक निष्कर्षांद्वारे ऑप्टिमायझेशन विश्लेषणाची पुष्टी करण्यात आली, ज्यामुळे या संशोधनाची व्यावहारिक उपयुक्तता सिद्ध झाली आहे. प्रा. रोंगे यांची यशस्वी कारकीर्द केवळ प्रबंधापुरती मर्यादित नाही तर त्यांनी पीएच.डी. दरम्यान दोन संशोधन पेपर प्रतिष्ठित नियतकालिकांमध्ये प्रकाशित केले आहेत आणि दोन पेपर आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सादर केले आहेत, ज्यामुळे त्यांच्या क्षेत्रातील नाविन्यपूर्ण योगदानाची ओळख निर्माण झाली आहे. त्यांचे कार्य मायक्रोफ्लुइडिक्स क्षेत्रात दीर्घकालीन प्रभाव टाकेल आणि भविष्यातील संशोधनास प्रेरणा देईल. प्रा. दिग्विजय रोंगे यांचे हे यश केवळ त्यांच्या समर्पण आणि कौशल्याचे प्रतीक नाही, तर स्वेरी महाविद्यालय, पंढरपूरला ही गौरवान्वित करणारे असे आहे. डॉ. दिग्विजय रोंगे हे स्वेरीच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमध्ये गेल्या ६ वर्षांपासून उत्कृष्टपणे ज्ञानदान करत आहेत. त्यांचा 'ऑप्टिमाइझेशन ऑफ मायक्रो हीट सिंक विथ रिपीटेटिव्ह पॅटर्न ऑफ ऑब्स्टॅकल्स फॉर इलेक्ट्रॉनिक कूलिंग अँप्लिकेशन्स' हे शीर्षक असलेला शोधनिबंध 'बेगेल हाऊस' च्या 'जर्नल ऑफ हीट ट्रान्सफर' मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे तसेच आंतरराष्ट्रीय जर्नल मधून शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. 'अविष्कार २०२४' स्पर्धेकरिता त्यांनी समन्वयक म्हणून उत्कृष्ट काम केले आहे. ते ज्ञानदानाबरोबरच अॅश्रे स्वेरी स्टुडंट ब्रँचचे मार्गदर्शक म्हणून काम पाहतात. पीएच.डी. प्राप्त झाल्याबद्दल प्रा. दिग्विजय रोंगे यांचे 'महिला दिनाचे औचित्य साधून मंत्रालयातील अधिकारी विक्रम शिंदे यांच्या हस्ते व पोलीस उप-अधीक्षक राजश्री पाटील, ब्रम्हकुमारी उज्वला बहनजी, मातोश्री सौ. वंदना रोंगे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे व माजी अध्यक्ष व विश्वस्त एन.एस. कागदे यांच्या उपस्थितीत पत्नी सौ ऐश्वर्या रोंगे यांच्या समवेत सत्कार करण्यात आला. संस्थेचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख, विश्वस्त व पदाधिकारी संस्थेअंतर्गत असणाऱ्या बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. एम. जी. मणियार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतिश मांडवे, इंजिनिअरींगच्या उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी डॉ. दिग्विजय रोंगे यांचे अभिनंदन केले आहे.