शिक्षणाबरोबरच उत्तम करिअर करण्यासाठी स्वेरीला प्राधान्य - डेप्युटी जनरल मॅनेजर अबीद शाहबाद
स्वेरीत ‘ऋणानुबंध २०२४’ संपन्न
पंढरपूरः ‘स्वेरी हे नाव केवळ जिल्हा नव्हे, राज्य नव्हे, तर जगविख्यात झाले आहे कारण स्वेरीतून शिक्षणाबरोबरच संस्कार घडतात. स्वेरीतील शिस्त जीवन यशस्वी करण्यासाठी उपयोगी पडते. स्वेरीच्या शिस्त आणि नियमांना माझा सलाम असून या शिस्तीमुळे माझी करिअरची रेल्वे सुरळीत धावत आहे. माझे शिक्षण अशा ठिकाणी झाले की क्लास, वर्कशॉप, प्रयोगशाळा आणि लायब्ररी हे सर्व एकाच ठिकाणी व्हायचे. डॉ. रोंगे सरांच्या शिस्तीमुळे आत्ताच्या विद्यार्थ्यांसाठी भव्य इमारत आणि सर्व सुविधा उपलब्ध आहेत. आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्वेरीतून उत्तम प्रकारे शिक्षण मिळत आहे. स्वेरीमध्ये शिक्षणाबरोबरच संस्कार देखील मिळत आहेत म्हणून विद्यार्थी व पालक शिक्षणाबरोबरच उत्तम करिअर करण्यासाठी स्वेरीला प्रथम प्राधान्य देतात’ असे प्रतिपादन स्वेरीच्या २००४ च्या बॅचचे विद्यार्थी व थायसन ग्रुप कंपनीचे डेप्युटी जनरल मॅनेजर अबीद शाहबाद यांनी केले.
पंढरपूर येथील स्वेरी अभियांत्रिकी, फार्मसी व एमबीए, एमसीए या मधून शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा ‘ऋणानुबंध २०२४’ हा मेळावा स्वेरीच्या सभागृहात नुकताच पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून स्वेरीच्या पदवी अभियांत्रिकीचे माजी विद्यार्थी व थायसन ग्रुप कंपनीचे डेप्युटी जनरल मॅनेजर अबीद शाहबाद हे मार्गदर्शन करत होते. महाराष्ट्र गीत, स्वेरी गीत व दिपप्रज्वलनानंतर स्वेरी अभियांत्रिकीच्या ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट चे अधिष्ठाता व माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव प्रा. ए. ए. मोटे यांनी मेळावा आयोजित करण्याचा हेतू सांगून माजी विद्यार्थी संघटनेच्या यशस्वी वाटचालीबद्दल माहिती सांगितली. या मेळाव्यात कोणी प्रशासकिय अधिकारी, कोणाची स्वतःची कंपनी, कोणी परदेशात स्थायिक, काही जण प्राध्यापक, कोणी उद्योजक, तर काहीजणी गृहिणी झाल्या होत्या. हे सर्वच जण ‘माजी विद्यार्थी मेळाव्या’च्या निमित्ताने स्वेरीत एकत्रित आले होते. यावेळी माजी विद्यार्थी आपल्या भावना, वाटचाल व आजपर्यंतचा प्रवास, त्याला स्वेरीमुळे आलेले यश या बाबी शब्दात सांगत होते. ‘हार्ड वर्क’ शिस्त व संस्कार या स्वेरीमधून मिळालेल्या शिदोरीमुळे आपण जीवनात यशस्वी होत असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. ज्यावेळी कंपनीत नोकरीकरिता रुजू झालो त्यावेळी स्वेरीतून अंगीकारलेली शिस्त व प्राध्यापकांनी आमच्यावर केलेले अनमोल संस्कार यांचा आज खूप फायदा होत आहे. त्यामुळे स्वेरीच्या अभ्यासपूरक वातावरण व जागतिक स्तरावर रुजवलेल्या शिस्तीचा फायदा कसा होतो? हे पटवून दिले. फार्मसीच्या २०१४ च्या बॅचचे विद्यार्थी सुरज देशमाने म्हणाले की, ‘स्वेरीतून हार्ड वर्कचे शिक्षण मिळाल्यानंतर त्या विद्यार्थ्याला करिअर करताना फारसा अडथळा येत नाही. परिश्रम कसे करायचे व आपल्या कामात एकाग्रता कशी राखायची? याचे शिक्षण स्वेरीमधून मिळाले. त्यामुळे मी जीवनात यशस्वी होत आहे. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी ‘जिद्द, कठोर मेहनत आणि डिसिप्लीन यांच्या माध्यमातून जीवनात यश कसे मिळवले जावू शकते' यावर प्रकाश टाकला. माजी विद्यार्थ्यांसमवेत त्यांनी मनमोकळेपणाने संवाद साधला. माजी विद्यार्थी संघटना विविध प्रकारे विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आणि स्वेरीच्या जडणघडणीत मोलाचा सहभाग नोंदवत आहेत. माजी विद्यार्थी स्वेरीला वेळोवेळी भेट देवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात, याचबरोबर विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळण्यासाठी मदत करतात. यावेळी डिप्लोमा फार्मसीच्या माजी विद्यार्थिनी व एव्हर टोझन फार्मा कंपनीतील प्रिती अवचर, अॅड. सुर्यकांत भोसले, पहिल्या बॅचचे विद्यार्थी आसिफ खतीब,पदवी अभियांत्रिकीच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष गुरुप्रसाद तेलकर यांच्यासह काही माजी विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करून भावना मांडल्या. याचबरोबर त्यांनी माजी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून वर्षभरात होणाऱ्या सर्व उपक्रमाचा आढावा सांगितला. त्याचबरोबर माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने स्वेरीच्या पदवी अभियांत्रिकी मधील टॉपर्स विद्यार्थ्यांना सुवर्णपदकाने गौरवण्यात आले. यावेळी संस्थेचे विश्वस्त एच.एम. बागल, युवा विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. एम.जी. मनियार, डिप्लोमा चे प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतिश मांडवे, अभियांत्रिकीच्या उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, तसेच फार्मसी, अभियांत्रिकीच्या व एमबीए च्या स्थापनेपासून ते गतवर्षी उत्तीर्ण झालेले जवळपास ४०० हून अधिक विद्यार्थी, प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ.यशपाल खेडकर यांनी केले तर स्वेरीच्या पदवी अभियांत्रिकीच्या माजी विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष दत्तात्रय घोडके यांनी आभार मानले.
छायाचित्र-
छायाचित्रः- स्वेरीत माजी विद्यार्थ्यांचा मेळावा ‘ऋणानुबंध २०२४’ संपन्न झाला यावेळी डावीकडून आसिफ खतीब, विश्वस्त एच.एम. बागल, अॅड. सुर्यकांत भोसले, डॉ. एम.जी.मनियार, प्रा. एस.व्ही.मांडवे, सुरज देशमाने, दत्ता घोडके, डेप्युटी जनरल मॅनेजर अबीद शाहबाद, युवा विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, प्रिती अवचर, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष गुरुप्रसाद तेलकर, संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे सोबत माजी विद्यार्थ्यांसोबत हितगुज साधताना संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे.