शिकण्यात एकलव्यासारखी एकाग्रता हवी
-पद्मश्री डॉ. संजय धांडे
स्वेरीमध्ये दुसरा पदवीप्रदान समारंभ उत्साहात संपन्न
पंढरपूर- ‘आपण एकलव्यासारखे विद्यार्थी व्हा. खूप सराव केल्यावर आपल्या कार्यात एक्स्पर्ट होता येते. सकारात्मकता, गुणवत्ता, अचूकता, एकाग्रता ही कोणत्याही विद्यापीठात शिकवली जात नाही तर या बाबी स्वतः आत्मसात कराव्या लागतात. कठोर परिश्रम केल्यानंतर मिळालेल्या यशाचा आनंद हा दीर्घकाळ टिकतो. आपण कोणतेही कार्य हाती घ्या मात्र त्या कार्यात उत्सुकता आणि जिज्ञासा असावी. एकलव्याने मातीच्या पुतळ्याला प्रत्यक्ष गुरु मानून धनुर्विदयेचे शिक्षण घेतले. आपण देखील आपल्या शिकण्यात एकलव्यासारखी एकाग्रता साधावी.’ असे प्रतिपादन आय.आय.टी., कानपूरचे माजी संचालक व पद्मश्री किताबाने सन्मानित शिक्षणतज्ञ प्रा. डॉ. संजय धांडे यांनी केले.
गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचालित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस), कॉलेज ऑफ फार्मसी व कासेगाव (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर अँड मॅनेंजमेंट स्टडीज् च्या वतीने हा संस्थास्तरीय दुसरा दिक्षांत समारंभ संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आय.आय.टी., कानपूरचे माजी संचालक व पद्मश्री अवार्ड विजेते डॉ. संजय धांडे हे बोलत होते. विशेष अतिथी म्हणून आय.सी.टी. महाविद्यालयाचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. भास्कर थोरात हे होते. महाराष्ट्र गीत, विद्यापीठ गीत आणि स्वेरी गीतानंतर प्रास्ताविकात स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी. पी. रोंगे यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समृद्धता साधण्यासाठी १९९८ साली स्थापन केलेल्या स्वेरीची पार्श्वभूमी सांगितली. ते म्हणाले, 'स्वेरीत सध्या संशोधनाचे वातावरण तयार झाले असून याद्वारे प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकसित होत आहे. सकारात्मक विचारसरणीमुळे संस्थेत प्रगती होताना दिसत आहे'. असे सांगून विद्यार्थी दशेतच आपले ध्येय ठरवा व त्या दिशेने झेप घ्या असे आवाहन त्यांनी केले. विशेष अतिथी डॉ.थोरात म्हणाले की, ‘उद्योजक होण्यासाठी मोठे असावेच असे नाही, लहान असले तरी चालते. फक्त परिश्रम करण्याची जिद्द अंगी असावी. नेतृत्व तेंव्हाच करता येईल जेंव्हा आपल्या विचारात परीपक्वता असेल. कठोर परिश्रम, वेळेचे बंधन, अचूकता, कमतरता दूर करणे असे विविध प्रश्न विद्यार्थ्यांना पडले पाहिजेत. आजूबाजूचे वातावरण, जागतिक बाजारपेठ, चिकाटीपणा, दूरदृष्टिकोन आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शिकण्याची इच्छा असावी लागते तरच आपल्याला नेतृत्व करता येईल. मोठे स्वप्न बघा आणि त्याचा पाठपुरावा करा. मोठमोठ्या उद्योजकांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा. त्यामुळे आपल्याला प्रेरणा मिळते.’ असे सांगून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, शके बाराशे ते पंधराशे दरम्यानचे संत, अश्विन जोशी, अश्विनी डहाणे, मुकेश अंबानी, अंजली रेड्डी, कृष्णा इलाई आदी उदाहरणे देऊन जीवनात यशस्वी होण्यासाठी परिश्रमाची गरज आहे हे पटवून दिले.’ यावेळी सन २०२३-२४ मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग, एम.बी.ए., एम.सी.ए., बी.फार्मसी, एम. फार्मसी तसेच आय.सी.एम.एस. मधील विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रे आणि अंतिम सत्र परीक्षेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत आलेल्या प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण व सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते पदक, प्रमाणपत्र देवून विद्यार्थ्यांच्या पालकांसहीत सन्मान करण्यात आला. पदवीप्रदान समारंभ प्रसंगी इमारतीच्या प्रवेशद्वारापासून ते मुख्य रंगमंचापर्यंत परीक्षा विभागाचे स्वेरीचे नियंत्रक डॉ. एस.ए.लेंडवे यांच्या नेतृत्वाखाली ज्ञानदंडाची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीमध्ये सर्व मान्यवर, संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी, इंजिनिअरिंगच्या बी. फार्मसीचे प्राचार्य, सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक, पदवीधर व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी सौ. मेधा धांडे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त एन.एस. कागदे, संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त धनंजय सालविठ्ठल, विश्वस्त एच.एम.बागल, विश्वस्त बी.डी.रोंगे, युवा विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. एम.जी. मणियार, इंजिनिअरिंगच्या उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी व पालक आदी उपस्थित होते. प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ. यशपाल खेडकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.