समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणारे पर्यायी तंत्रज्ञान विकसित होणे आवश्यक -राजीव गांधी सायन्स अँड टेक्नोलॉजीचे डॉ.नरेंद्र शाह स्वेरीमध्ये पाचवी आंतरराष्ट्रीय परिषद ‘टेक्नो- सोसायटल २०२४’ चे थाटात उदघाटन



समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणारे पर्यायी तंत्रज्ञान विकसित होणे आवश्यक

                                                                      -राजीव गांधी सायन्स अँड टेक्नोलॉजीचे डॉ.नरेंद्र शाह

स्वेरीमध्ये पाचवी आंतरराष्ट्रीय परिषद ‘टेक्नो- सोसायटल २०२४’ चे थाटात उदघाटन



पंढरपूर: ‘समाजासाठी तंत्रज्ञान हा माझ्या आस्थेचा विषय असून स्वेरीतील या आंतरराष्ट्रीय परिषदेचा विषय अतिशय मोलाचा आहे. तंत्रज्ञानाची निर्मिती आणि त्याची सकारात्मक कार्यासाठी अंमलबजावणी करणे ही सोपी गोष्ट नाही. एखाद्या तंत्रज्ञानाचा वापर करताना त्या तंत्रज्ञानाशी संबंधित सर्व छोट्या मोठ्या बाबींचा बारकाईने विचार करणे आवश्यक आहे. समाजाचे प्रश्न शोधणे आणि त्या प्रश्नांची पर्यायी व सर्व सामान्य माणसांना परवडणारी अशी उत्तरे शोधणे हे आज फार गरजेचे आहे. आज आपला देश एका स्थित्यंतराच्या अवस्थेत आहे. तरुणांच्या बदलत्या गरजा पूर्ण करणे हे तंत्रज्ञानासमोरचे एक मोठे आव्हान आहे. तंत्रज्ञानातून ग्रामीण विकास, शिक्षण, पाणी, बेरोजगारी आदी समस्यांवर उपाय शोधणे आवश्यक आहे. आजच्या तरुण पिढीने त्यांच्या क्षेत्राशी संबंधित नसणाऱ्या बाबींचे देखील ज्ञान मिळवले पाहिजे. एकंदरीत आज ‘समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणारे पर्यायी तंत्रज्ञान विकसित होणे आवश्यक’ आहे असे प्रतिपादन राजीव गांधी सायन्स अँड टेक्नोलॉजी कमिशनचे सदस्य सचिव डॉ. नरेंद्र शाह यांनी केले.

      गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमध्ये स्कूल ऑफ लाईफ सायन्सेस, पु. अ. हो. सोलापूर विद्यापीठ सोलापूर व स्वेरी, पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच पु. अ. हो. सोलापूर विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांच्या सहकार्याने पीएम- उषा या योजनेअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या पाचवी आंतरराष्ट्रीय परिषद ‘टेक्नो-सोसायटल २०२४’ च्या उदघाटन प्रसंगी अध्यक्षस्थानावरून आयआयटी बॉम्बेचे नरेंद्र शहा हे मार्गदर्शन करत होते. जोगदंड महाराजांच्या अनुयायींकडून पंढरीचे महात्म्य असलेल्या सुरेल अभंगवाणीने कार्यक्रमाला सुरवात झाली. दिपप्रज्वलनानंतर स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांनी मान्यवरांचे, पाहुण्यांचे, सहभागी प्राध्यापक व संशोधकांचे स्वागत करून स्वेरी संस्थेच्या सुरुवातीपासून ते आजपर्यंतच्या यशस्वी वाटचालीवर प्रकाश टाकला. या आंतरराष्ट्रीय परिषदेचे सहसमन्वयक व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार यांनी या आंतरराष्ट्रीय परिषदेची सुरुवात कशी झाली आणि ही परिषद आयोजित करण्यामागचा हेतू स्पष्ट करून २०१६, २०१८, २०२० आणि २०२२ साली झालेल्या परिषदेवर प्रकाश टाकला. यावेळी प्रमुख पाहुणे व उदघाटक म्हणून सिंगापूर मधील एनयुएसचे डॉ. प्रल्हाद वदकेपात मार्गदर्शन करताना म्हणाले की, ‘विठ्ठलाच्या पवित्र पावन भूमीत आल्याचा आज मला मनस्वी आनंद झाला. या भागात सर्वात मौल्यवान असणारी गोष्ट म्हणजे मानवता पाहायला आणि अनुभवायला मिळाली. आपण तंत्रज्ञानात कितीही प्रगती साध्य केली तरी कला, कौशल्ये, साहित्य या बाबी कधीही विसरू नयेत. आज आपण इंडस्ट्री ५.० कडे मार्गक्रमण करत आहोत. आर्टीफिशियल इंटेलिजन्स, बिग डेटा इ. क्षेत्रे मनुष्याला सामर्थ्य देणारी आहेत. आपण आपल्या परंपरा, कुटुंब, नातीगोती या बाबी न विसरता तंत्रज्ञानाचा वापर करून पुढे जाणे आवश्यक आहे. यावेळी ‘टेक्नो-सोसायटल २०२४’च्या बुक ऑफ अॅबस्ट्रॅक्ट चे प्रकाशन देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या पहिल्या दिवशीच्या परिषदेत मलेशियातील हेल्फ विद्यापीठातील प्रा. डॉ. आर. लोगेश्वरन, ‘कन्नूर (केरळ) मधील विनोय विष्णू वदक्केपात, गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कराडचे प्राचार्य डॉ. विनायक कुलकर्णी, आयआयटी बॉम्बेचे डॉ. परमेश्वर उदमले, गुरुनानक देव कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, बिदर (कर्नाटक) चे प्रा. वीरेंद्र डाकुलगी, कृषी विद्यापीठ, अहिल्यानगरचे माजी प्राचार्य डॉ. डी. एस. गोरंटीवार, यूएस मधील डॉ.विशाल धमगाये यांच्यासह महाराष्ट्रासह इतर राज्यातील जवळपास ५०० हून अधिक संशोधक उपस्थित होते. उद्या, शनिवार (दि.१४ डिसेंबर) रोजी ऑनलाईन माध्यमातून अमेरिकेमधून जॉर्ज मेशन विद्यापीठाच्या डॉ. सपना गंभीर, ताश्कंद इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी, उझबेकिस्थानचे डॉ. बोथीर उस्मोनोव्ह, देला सॅली विद्यापीठ फिलिपिन्सचे लॉव सायमन चाटीमबंग, दुबई मधून अमेटी विद्यापीठातील डॉ.व्यंकट रेड्डी पोलुरू, आयआयटी जम्मु चे डॉ. विजयकुमार पाल, मलेशियातील जालन विद्यापिठाचे डॉ. यीप किम हु, आयआयटी भुवनेश्वरचे डॉ. गौरव भरतार्या यांच्यासह तज्ञ संशोधक व अभ्यासक आपले शोध पेपर सादर करणार आहेत. यावेळी बीएआरसीचे शास्त्रज्ञ व्ही.के.सुरी, पु.अ.हो. सोलापूर विद्यापीठाचे डॉ. व्ही. बी. पाटील, सिनेट सदस्य डॉ.विरभद्र दंडे, डॉ.राजेंद्र वडजे, गीतादिदी जोगदंड तसेच स्वेरीचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, माजी अध्यक्ष व विश्वस्त नामदेव कागदे, माजी अध्यक्ष व विश्वस्त धनंजय सालविठ्ठल, विश्वस्त एच.एम. बागल, विश्वस्त बी.डी. रोंगे, युवा विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, स्वेरीच्या चारही महाविद्यालयांचे प्राचार्य, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. या उदघाटन समारंभाचे सूत्रसंचालन एम.बी.ए. विभागाच्या डॉ. मीनल भोरे यांनी केले. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या दिशादर्शक मार्गदर्शनाखाली समन्वयक डॉ. अमरजित केने यांच्या नेतृत्वाखाली ‘टेक्नो-सोसायटल २०२४’ च्या यशस्वीतेसाठी सर्वजण परिश्रम घेत आहेत.


क्षणचित्रे- 

• या परिषदेच्या निमित्ताने बाहेरून आलेल्या पाहुण्यांची निवास व्यवस्था, नाश्ता व सकस भोजन आदी बाबींची स्वेरी कॅम्पस मध्ये उत्तमप्रकारे सोय करण्यात आली आहे. 

• स्वेरी कॅम्पस मध्ये रांगोळीने केलेले स्वागत, फुलांचा दरवळणारा सुगंध आणि संशोधक पाहुण्यांची रेलचेल लक्ष वेधून घेत आहे.

• परिषदेसाठी आलेल्या संशोधकांना काहीही कमी पडू नये यासाठी स्वेरी संस्थेचे पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यावर बारीक लक्ष ठेवून आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad