*आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत शिक्षकाने शिकले पाहिजे.*
*उत्कृष्ट शिक्षक म्हणून प्रा. अनिल जाधव सन्मानित: पंढरपूर सिंहगड मध्ये शिक्षण दिन उत्साहात साजरा*
पंढरपूर: प्रतिनिधी
आयुष्यात शिक्षकाचे योगदान महत्वपूर्ण आहे. शिक्षक दिन हा शिक्षक दिनानिमित्त न साजरा करता दररोज साजरा झाला पाहिजे. आईवडिलांच्या नंतर शिक्षक हा आयुष्यातील पहिला गुरू असतो. शिक्षक हा शेवटपर्यंत हा विद्यार्थी असला पाहिजे यामधून चांगला शिक्षक घडत असतो. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत शिक्षकाने शिकले पाहिजे. काही गोष्टी पुन्हा पुन्हा शिकले पाहिजे. त्यांचे आपल्या जीवनात खुप मोठे स्थान आहे. चुकीच्या गोष्टी आपण विसरल्या पाहिजेत. विद्यार्थ्यांच्या आयुष्यात शिक्षकांची भुमिका अतिशय महत्वाची असते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना परीक्षेत मार्क्स मिळविण्यासाठी शिकविले नाही पाहिजे. विद्यार्थ्यांचा सर्वागिण विकास कसा होईल असे शिक्षण शिक्षकांनी दिले पाहिजे. शिक्षणाशिवाय आपली प्रगती अशक्य आहे. आयुष्यात जास्त सन्मान शिक्षकाला असतो. चांगल्या शिक्षकांची ख्याती जगभर असते असे मत डाॅ. मोहन देशपांडे यांनी मत व्यक्त केले.
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये गुरुवार दिनांक ५ सप्टेंबर २०२४ रोजी डाॅ. सर्वपलली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून शिक्षण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असल्याची माहिती प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांनी दिली.
शिक्षक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाची सुरवात प्रमुख पाहुणे डाॅ. मोहन देशपांडे, प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डाॅ. स्वानंद कुलकर्णी, डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. संपत देशमुख आदींच्या हस्ते डाॅ. सर्वपलली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रमुख पाहुणे डाॅ. मोहन देशपांडे यांचा महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. उपप्राचार्य डाॅ. स्वानंद कुलकर्णी यांनी प्रमुख पाहुणे यांचा परिचय करून दिला. यावर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील प्रा. अनिल जाधव यांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी वैष्णवी पाटिल व श्रावणी बुचके यांनी केल तर उपस्थितांचे आभार प्रदर्शन डाॅ. दिपक गानमोटे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.