*पंढरपूर सिंहगड मध्ये प्रकृती आणि आपदा प्रबंधन जनजागृती अभियान संपन्न*
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये प्रकृती आणि आपदा प्रबंधन जनजागृती अभियान आयोजित करण्यात आले होते. हे अभियान मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पुजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यादरम्यान उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी व प्रा. अंजली चांदणे यांचे हस्ते बीके प्रज्ञा दिदी, बीके उज्वला दिदी, बीके अस्मिता दिदी, बीके मस्के भाऊ यांचा महाविद्यालयाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी प्रज्ञा दिदी म्हणाल्या, पर्यावरणाचा असंतुलन असण्याचे कारण म्हणजे आपण जे प्रदूषित घटक वातावरणामध्ये टाकत आहोत तेच आहे आणि सुविधा भरपूर झाल्यामुळे प्रत्येक बाबीचं महत्त्व कमी झाल्याने प्रत्येक गोष्टीमध्ये प्रदूषण होत आहे. मानसिक प्रदूषण सर्वात मोठे प्रदूषण असून हे दूर करण्यासाठी मानसिक आरोग्य सुधारणे आवश्यक आहे. नैसर्गिक आपत्ती ही मनुष्यनिर्मित आपत्ती असून त्याच्या सुरक्षेसाठी आध्यात्मिक शांती शिवाय पर्याय नाही. ओम शांती केंद्राचे महत्व कार्य विशद करत पर्यावरणाचे महत्त्व सांगितले. वृक्षवल्ली आम्हा सोयरे या उक्तीप्रमाणे जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून नैसर्गिक आपत्ती दूर करण्याची गरज असुन पर्यावरणाचे रक्षण करायचे असेल तर वृक्ष लागवड व संवर्धन अतिशय आवश्यक आहे त्यासाठी सर्वांनी वृक्षांचे संवर्धन करणे महत्वाचे आहे असे मत प्रज्ञा दिदी यांनी या दरम्यान बोलताना व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाश चौगुले व श्रद्धा पंधे यांनी केले तर आभार प्रा. अंजली चांदणे यांनी मानले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी सह सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.