स्वेरीच्या विद्यार्थ्यांचा गुजरातमध्ये झालेल्या प्रशिक्षणात सहभाग 'इव्हीटी-२०२४' या विषयावर केले सादरीकरण


स्वेरीच्या विद्यार्थ्यांचा गुजरातमध्ये झालेल्या प्रशिक्षणात सहभाग

'इव्हीटी-२०२४' या विषयावर केले सादरीकरण




पंढरपूर- गुजरात मधील सुरत येथील सरदार वल्लभभाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या विभागामार्फत ‘इलेक्ट्रिक व्हेईकल टेक्नोलॉजी टू वर्ड संस्टेनेबल ट्रान्सपोर्टेशन’ अर्थात 'इव्हीटी-२०२४' या विषयावर प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विभागामधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेवून इलेक्ट्रिक व्हेइकल तंत्रज्ञानाविषयी अद्ययावत माहिती जाणून घेतली.

       स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विभागात तिसऱ्या व अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या प्रिती प्रशांत लोंढे, नेहा उद्धवराव सोमवंशी व प्रणाली सदाशिव रगाटे या तीन विद्यार्थिनी व आदित्य विष्णुमूर्ती होल्ला, शुभम नेताजी थिटे, मुकुंद मारुती तळेकर, तानाजी पंढरीनाथ लंगोटे, साईराज प्रवीण राऊत व अभिषेक रत्नाकर मोहोळकर या सहा विद्यार्थ्यांची निवड झाली होती. पाच दिवस चाललेल्या या प्रशिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिक वाहनांच्या मूलभूत गोष्टी, फायदे, या क्षेत्रातील नोकर्‍या, उद्योग आणि इतर पैलूंची ओळख करून देण्यात आली. इलेक्ट्रिक वाहनांबाबतची सरकारी धोरणे, इलेक्ट्रिक वाहने का निवडायची?, पारंपारिक इंधनावर चालणारी वाहने व इलेक्ट्रिक वाहने यामधील फरक या सर्व बाबींची माहिती देण्यात आली. इलेक्ट्रिक वाहनांची देखभाल, वाहनावर होणारा खर्च तसेच वाहनांची काळजी कशी घ्यावी, त्यांच्या किमती याबाबत माहिती देण्यात आली तसेच पारंपारिक वाहने पर्यावरणासाठी कशी हानिकारक आहेत, याबाबत विवेचन करण्यात आले. इलेक्ट्रिक वाहनांची नियंत्रण प्रणाली, पॉवर इलेक्ट्रॉनिक कन्व्हर्टर, आधुनिक इलेक्ट्रिक ड्राइव्ह, इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वापरले जाणारे मायक्रो-कंट्रोलर आणि एम्बेडेड सिस्टीमची नेमकी भूमिका काय असते?, मल्टीफेसची ओळख, पाच फेज इंडक्शनने वेग नियंत्रण, मोटर रेटिंगची निवड, मॅटलॅब आणि विविध मॉडेल्सचे सिम्युलेशन या महत्त्वाच्या बाबींवर प्रकाश टाकण्यात आला. या बाबींच्या प्रात्यक्षिकासाठी टाटा मोटार व्हेईकल या कंपनीला भेट देण्यात आली. तेथील कर्मचाऱ्यांनी इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाची ओळख करून दिली तसेच इलेक्ट्रिक वाहन कंपनीचा सेल्स विभाग, मॉडेल डिझाइन, बॅटरी आदी बाबत प्रात्यक्षिके करून दाखवण्यात आली. या प्रशिक्षणामध्ये सहभागी असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सदरचे प्रशिक्षण हे संस्थेचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, उपप्राचार्य डॉ. मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली व प्रा. स्मिता गावडे यांच्या सहकार्याने पार पडले. या प्रशिक्षणामुळे इलेक्टीकल वाहनां संदर्भात विद्यार्थ्यांच्या माहितीत मोलाची भर पडली, हे मात्र नक्की!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad