*पंढरपूर सिंहगडच्या प्रा. सोमनाथ झांबरे कडून आषाढी वारीत पोलीस बंदोबस्तासाठी सॉफ्टवेअरची निर्मिती*
पंढरपूर: प्रतिनिधी
कोणताही उत्सव, यात्रा, सामाजिक, राजकीय कार्यक्रम यांचं नियोजन म्हटलं की, सर्वाधिक ताण-तणाव हा पोलीस प्रशासनावर येत असतो. पोलीस प्रशासनावरील ताणतणाव कमी व्हावा यासाठी एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये काॅम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग विभाग कार्यरत असलेले प्रा. सोमनाथ झांबरे यांनी सॉफ्टवेअरची निर्मिती केली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
सध्या आषाढी वारी निमित्त पोलीस प्रशासनावर खुप मोठी जबाबदारी आहे. दर वर्षी आषाढी एकादशीला पंढरपूर येथे ही लाखो वैष्णवांचा मेळा भरतो. या मध्ये मोठ्या प्रमाणात सोलापूर जिल्हा व संपूर्ण महाराष्ट्रातून पोलीस बंदोबस्त मागवला जातो. गरजेनुसार ठीक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देण्यात येतो. यामध्ये विविध टप्प्यावर पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना जबाबदारी दिली जाते. अतिशय संवेदनाशील असा हा पोलीस बंदोबस्त लावण्यासाठी पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग काॅलेज मधील कॉम्पुटर सायन्स अँड इंजिनीअरिंग विभागातील प्रा. सोमनाथ झांबरे यांनी सॉफ्टवेअर बनवले असून या सॉफ्टवेअर द्वारे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना त्यांच्या बंदोबस्ताचे ठिकाणची माहिती, आपल्या पॉईंटचे, प्रभारी, सहप्रभारी, आपल्या सोबत असणारी टीम, हजेरी रेकॉर्ड, ड्युटी शिफ्ट अशी सर्व प्रकारची माहिती मोबाईल वर उपलब्ध होणार आहे. तसेच त्यांच्या मोबाइल मध्येच डिजिटल स्वरूपात ड्युटी पास देखील उपलब्ध होणार आहे. याशिवाय वरिष्ठ पोलीस अधिकरी वेळोवेळी संपूर्ण बंदोबस्तास महत्वाच्या सूचना पाठवू शकणार आहेत. बंदोबस्त कंट्रोल विभाग संपूर्ण बंदोबस्त स्कीम, दैनंदिन गैरहजेरी अहवाल, कसुरी अहवाल, ड्युटी चार्ट असे अनेक रिपोर्ट एका क्लिक मध्ये या सॉफ्टवेअर मधून मिळवू शकणार आहेत.
वरिष्ठ अधिकारी संपूर्ण बंदोबस्त चेक करून बंदोबस्तावरील सर्व अधिकारी, अंमलदार यांच्या हजेरीच्या नोंदी घेऊ शकणार आहेत. याशिवाय अशा अनेक सुविधा या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून पोलीस प्रशासनास मिळणार आहेत. सोलापूर ग्रामीण पोलीसचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे या सॉफ्टवेअर माहिती घेतल्यानंतर म्हणाले हे सॉफ्टवेअर खूपच पोलीस प्रशासनासठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.