सिंहगड महाविद्यालयाचा अभिमान: महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थिनींना ARCI Hyderabad मध्ये राष्ट्रीय संशोधन प्रकल्पासाठी निवड
पंढरपूर | २०२५ - एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी-पंढरपूर येथील यांत्रिकी अभियांत्रिकी विभागातील अंतिम वर्षाच्या कु. अंकिता अविनाश बागल, कु. तनुजा सोमेश्वर पाटील आणि कु. ऋतुजा पोळ या विद्यार्थिनींना भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागांतर्गत कार्यरत असलेल्या प्रतिष्ठित इंटरनॅशनल ऍडव्हान्स्ड रिसर्च सेंटर फॉर पावडर मेटलर्जी अँड न्यू मटेरियल्स (ARCI), हैदराबाद येथे प्रोजेक्ट वर्क करण्याची अधिकृत मंजुरी प्राप्त झाली आहे.
ARCI हे सामग्री विज्ञान, पावडर मेटलर्जी, ऊर्जा साहित्य आणि औद्योगिक संशोधन क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील अग्रगण्य संशोधन केंद्र असून येथे प्रोजेक्ट करण्याची संधी मिळणे ही विद्यार्थिनींच्या शैक्षणिक गुणवत्तेची आणि संशोधन क्षमतेची महत्त्वपूर्ण दखल आहे. प्रोजेक्ट कालावधीत विद्यार्थिनींना प्रतिमहिना रु. ५,०००/- स्टायपेंड देण्यात येणार आहे.
या उल्लेखनीय यशासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, पब्लिकेशन डीन डॉ. संपत देशमुख, यांत्रिकी अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी यांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मोलाचे ठरले आहे.
ARCI, Hyderabad येथे विद्यार्थिनींना अत्याधुनिक संशोधन प्रयोगशाळांमध्ये प्रत्यक्ष काम करण्याची तसेच अनुभवी वैज्ञानिक आणि संशोधकांसोबत थेट संवाद साधण्याची महत्वपूर्ण संधी प्राप्त होणार आहे.
यांत्रिकी अभियांत्रिकी विभागातर्फे दोन्ही विद्यार्थिनींचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून त्यांच्या भावी संशोधन प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या आहेत.
हे यश सिंहगड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या तांत्रिक क्षमतेचे, संशोधन प्रतिबद्धतेचे आणि नवनिर्मितीक्षम विचारसरणीचे उत्कृष्ट उदाहरण ठरत आहे.

