मोर चौक- वाडी रस्त्यासाठी कृतीसमितीचा आंदोलनाचा इशारा
तीन हजार सह्यांचे निवेदन बेदखल
नांदेड, दि.१८ (प्रतिनिधी)-मोर चौक ते पावडेवाडी रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिक कृती समितीच्या वतीने करण्यात आली होती. जवळपास साडेतीन हजार नागरिकांच्या स्वाक्षर्या या निवेदनावर होत्या. परंतु या निवेदनाची अद्यापपर्यंत दखल घेतली गेली नसल्यामुळे दि.२३ जुलैपासून आंदोलन करण्याचा इशारा नागरिक कृती समितीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांना दिला आहे.
मोर चौक ते पावडेवाडी रस्त्याची दयनिय अवस्था झाली असून, या रस्त्याचे काम करण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. खराब रस्त्यामुळे परिसरात राहणार्या नागरिकांचे हाल होत असून, दि.९ जुलै रोजी नागरिक कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकार्यांना व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देवून रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली होती. या निवेदनावर तीन ते साडेतीन हजार नागरिकांच्या स्वाक्षर्या होत्या. परंतु या कामास अद्यापही सुरुवात करण्यात आली नाही. जवळपास तीन ते साडेतीन हजार लोकांच्या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने या परिसरातील नागरिक संताप व्यक्त करत असून, तातडीने रस्त्याच्या कामाला सुरुवात न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा येथील नागरिकांनी नागरिक कृती समितीच्या माध्यमातून दिला आहे. निवेदनावर नागरिक कृती समितीचे अध्यक्ष दिलीप शिंदे, सचिव विजय कुलकर्णी, संकेत जमदाडे, वसंत क-हाळे, किरण नाईक, शिवशंकर लकडे यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षर्या आहेत.