*ग्रामीण भागातील स्वयंपाकासाठी ऊर्जा समस्येवर प्रभावी समाधान देणाऱ्या चुलीसाठी पंढरपूर सिंहगडला पेटंट प्राप्त*
पंढरपूर: प्रतिनिधी
२२ जून २०२४ एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूरच्या संशोधकांना ग्रामीण भागातील स्वयंपाकाच्या ऊर्जा समस्येवर प्रभावी उपाय म्हणून नविन स्वयंपाकासाठी चुलीचे पेटंट मंजूर झाले आहे. हे पेटंट ग्रामीण भागातील स्वयंपाकासाठी आवश्यक असलेल्या विविध आकारांच्या आणि प्रकारांच्या बायोमासला जाळण्याची क्षमता असलेल्या नविन चुलीसाठी दिले गेले आहे. अशी माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
या महत्त्वपूर्ण संशोधनात पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग काॅलेज मधील अर्चना स्वानंद कुलकर्णी, गणेश दत्तात्रय काळे, डाॅ. कैलाश जगन्नाथ करांडे, प्रा. प्रसाद पद्माकर कुलकर्णी, डाॅ. स्वानंद गजानन कुलकर्णी, डॉ. संपत गोविंद देशमुख, डॉ. अतुल श्रीपाद आराध्ये, डाॅ. अतुल अभिमन्यू सगडे, डाॅ. श्याम श्रीधर कुलकर्णी आदींचे योगदान लाभले आहे. नविन चुलीचे वैशिष्ट्य असे आहे की ती कोणत्याही आकाराचे आणि प्रकाराचे नैसर्गिकरित्या उपलब्ध लाकूड किंवा बायोमास जाळण्याची क्षमता ठेवते, ज्यामुळे ग्रामीण भागातील लोकसंख्येला ऊर्जा गरजा पूर्ण करण्यात मदत होते. या चुलीमध्ये उंची, लांबी, आकार आणि प्रकाराच्या समायोजनाची सुविधा आहे तसेच आर्द्रता असलेल्या बायोमासला पूर्णपणे जळण्यासाठी समायोजित हवेचा पुरवठा दिला जातो. आज भारतात स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या १,१०४ टेरावॅट-तास ऊर्जा वापराला कमी करण्यासाठी ही चुल महत्त्वपूर्ण ठरणार आहे. एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूरच्या संशोधकांच्या मते, या नविन चुलीमुळे ग्रामीण भागातील स्वयंपाकाच्या ऊर्जा समस्यांवर प्रभावी उपाय मिळणार आहे आणि त्यामुळे तेथे राहणाऱ्या लोकांना अधिक सोयीस्कर आणि स्वस्त ऊर्जा साधन मिळणार आहे.
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूरच्या संशोधकांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे.