वृक्षसंवर्धन चळवळ काळाची गरज - आ समाधान आवताडे

 वृक्षसंवर्धन चळवळ काळाची गरज - आ समाधान आवताडे



प्रतिनिधी- वाढत्या औद्योगिककरणामुळे दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे तापमानात वाढ होऊन पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. तो थांबवण्यासाठी वृक्ष लागवड करून संवर्धन करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी व्यक्त केले आहे. 


मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मेडियम स्कूल येथे आयोजित तालुक्यातील मुख्याध्यापक सहविचार सभा या कार्यक्रमाप्रसंगी आमदार आवताडे हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पंचायत समिती गटविकास अधिकारी योगेश कदम, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रदीप खांडेकर, माजी संचालक राजन पाटील, शिक्षणाधिकारी डॉ बिभिषण रणदिवे, डॉ. नंदकुमार शिंदे, प्राचार्य सुधीर पवार आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना आमदार आवताडे यांनी सांगितले की, मंगळवेढा तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांची एकूण संख्या ४१००० हजाराच्या आसपास असून विद्यार्थी संख्या एवढीच झाडे आपण तालुक्यातील सर्वच शाळांमार्फत वृक्षारोपण करण्याचा संकल्प हाती घेतला आहे त्यामुळे वृक्ष लागवडीची ही चळवळ लोकसहभागातून गतिमान करून जास्तीत जास्त झाडे लावण्याचे अभियान तालुकाभर दिसणार आहे. पृथ्वीवरील प्रत्येक सजीवाला जगण्याचा अधिकार आहे. 


मंगळवेढा शहर व तालुक्यात विविध सामाजिक संस्था, शासकीय यंत्रणेमार्फत पर्यावरण संवर्धनावर काम करण्यात येत आहे. त्यामुळे पर्यावरणाची काळजी घेणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. शालेय जीवनातील विद्यार्थ्यांच्या मनावर आनंदी व आरोग्यमय जीवन जगण्याची संकल्पना रुजवण्यासाठी आपण सर्वांनी आपल्या दैनंदिन अध्यापन कर्तव्य सेवेच्या समवेत पर्यावरण पूरक आणि पोषक या मोहिमेमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवणे गरजेचे आहे. यासाठी तालुक्यातील सर्व मुख्याध्यापकांनी आपापल्या शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी यांचे प्रबोधन करून जास्तीत जास्त झाडे लावण्याचा संकल्प करणे हे सुद्धा तितकेच महत्वाचे आणि आवश्यक कार्य आहे.


प्रत्येकाने निसर्गाला परमेश्वर म्हणून त्या निसर्गाच्या संवर्धनाच्या रूपाने त्याची दैनंदिन पूजा करणे म्हणजेच निसर्गदेवतेला प्रसन्न करून घेण्याचा विधायक मार्गाने प्रयत्न असल्याचेही आमदार समाधान आवताडे यांनी यावेळी आवर्जून नमूद केले आहे. सदर कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रदीप खांडेकर, गट शिक्षणाधिकारी डॉ बिभिषण रणदिवे व महाराष्ट्र माझा चे संपादक अविनाश सुर्वे यांनीही आपली मनोगत व्यक्त करून आमदार आवताडे यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या या समाजाभिमुख चळवळीचा महत्त्वपूर्ण घटक होण्याचे आवाहन केले आहे.


या कार्यक्रमासाठी विविध मान्यवर तालुक्यातील विविध शाळांचे मुख्याध्यापक, तालुका शिक्षण विभागातील पदाधिकारी आणि पर्यावरण प्रेमी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad