आठवणीत रंगला माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा
स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये ‘माजी विद्यार्थी मेळावा’ संपन्न
पंढरपूर: गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये ‘माजी विद्यार्थी मेळावा’ नुकताच संपन्न झाला. माजी विद्यार्थी मेळावा हे विद्यार्थ्यांना पुन्हा जोडण्यासाठी, त्यांचे अनुभव शेअर करण्यासाठी आणि संस्थेच्या प्रगतीत योगदान देण्यासाठी उभारलेले एक व्यासपीठ असते. अशा माजी विद्यार्थ्यांचा व त्यांच्या व्यक्तिमत्वात दडलेल्या कुशल पदवीधरांचा संस्थेला नेहमीच सार्थ अभिमान असतो. या मेळाव्यामुळे माजी विद्यार्थ्यांमध्ये असलेली उर्जा द्विगुणीत होत असते. एकूणच स्वेरीमध्ये आठवणीत रंगलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्यात पद-प्रतिष्ठा सर्व विसरून विद्यार्थी दशेत एकत्र येवून आनंदोत्सव साजरा करत असल्याचे चित्र या मेळाव्यात स्पष्ट दिसत होते.
या कार्यक्रमासाठी डिप्लोमा फार्मसी, बी. फार्मसी व एम. फार्मसी या तिन्ही शाखांतील विद्यार्थी उपस्थित होते. या मेळाव्याच्या निमित्ताने फार्मसी महाविद्यालयातील माजी विद्यार्थी शिक्षण संपल्यानंतर स्वेरीमध्ये पुन्हा एकदा एकत्र आले होते. कॅम्पसमध्ये, वर्गात फेरफटका मारताना ते जुन्या आठवणी ताज्या करत होते. 'प्रत्येकजण आपले कॉलेज कसे होते आणि कसे आहे, हे डोळ्यांमध्ये साठवून घेत होता. जुना वर्ग मित्र भेटल्याचा आनंद देखील एकमेकांच्या चेहऱ्यावर जाणवत होता. संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी. रोंगे यांच्या नेतृत्वाखाली सन २००६ मध्ये स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसीची स्थापना झाली. तेंव्हापासून कॉलेजच्या यशाचा आलेख उंचावत चालला आहे. कॉलेज पूर्ण केल्यानंतर उत्तीर्ण झालेले विद्यार्थी हे विविध फार्मस्युटिकल कंपन्या, शिक्षण, नागरी सेवा, व्यवसाय आदी क्षेत्रात वेगवेगळ्या विभागांमध्ये आपले योगदान देत आहेत. विविध क्षेत्रांमध्ये काम करत असलेल्या या माजी विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमासाठी सहभाग नोंदवला. माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने मेळाव्याला सुरवात झाली. यावेळी प्राचार्य डॉ. एम.जी. मणियार म्हणाले की, ‘स्वेरी मध्ये शिक्षण घेवून आपण बाहेरील विश्वात यशस्वीपणे करिअर करत आहात याचा संस्थेला सार्थ अभिमान वाटतो. हे करत असताना सामाजिक कार्यात देखील योगदान दिले पाहिजे. सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी, त्यांच्या भविष्यासाठी उपयुक्त असे उपक्रम घेऊन ह्या विद्यार्थ्यांना आपला अनुभव सांगून सहकाऱ्याची भूमिका बजावावी. यामुळे तुमच्या अनुभवाचा फायदा ह्या विद्यार्थ्यांना देखील भविष्यात होईल.’ प्रा.आर.एस.नाईकनवरे यांनी फार्मसी कॉलेजच्या स्थापनेपासून ते आतापर्यंतची यशस्वी वाटचाल, मानांकने, वाढलेले इन्फ्रास्ट्रक्चर, यासाठी केले परिश्रम आणि याला मिळालेली मधुर व चवदार फळे याबाबत विस्तृत माहिती दिली. याप्रसंगी ‘आकार मेडिकल टेक्नॉलॉजी’ कंपनी मध्ये उत्पादन व्यवस्थापक असलेले स्वेरीचे माजी विद्यार्थी रोहित कांबळे म्हणाले की, ‘मी सध्या ज्या क्षेत्रात काम करत आहे इथे आवश्यक असणाऱ्या बऱ्याच गोष्टी मला माझ्या पदवीच्या शिक्षणादरम्यान शिकायला मिळाल्या. याचाच फायदा मला होत आहे. स्वेरी फार्मसीतून मिळालेल्या शिस्तीमुळेच मी इथपर्यंत पोहचू शकलो.’ असे सांगून विद्यार्थी दशेत असताना आलेला अनुभव सांगितला. दक्षिण आफ्रिकेतील ए.सी.जी. या मल्टिनॅशनल कंपनी मध्ये सेल्स इनचार्ज या पदावर कार्यरत असलेले माजी विद्यार्थी सागर चांडोले म्हणाले की,’ स्वेरीमध्ये राबवल्या जाणाऱ्या ‘ट्रिपल पी इ’ सिस्टिम मुळे माझ्या व्यक्तिमत्वामध्ये खूप मोठा बदल झाला. या बदलामुळे व स्वेरीतील शिस्तीमुळे यश संपादन करू शकलो.' माजी विद्यार्थी अक्षय पाटील, रणजित शिंदे, दीपाली यादव, अनुराधा पाटील, मंदाकिनी होळकर आदींनी देखील आपल्या मनोगतातून स्वेरीच्या माध्यमातून झालेला बदल आणि उज्वल करिअर याबद्धल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी माजी विद्यार्थ्यांना स्वेरीतर्फे स्मृतीचिन्हे देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी डिप्लोमा फार्मसीचे विभागप्रमुख डॉ. जे.बी.कंदले, समन्वयक डॉ. डी.जे. यादव, डॉ. व्ही.व्ही. मोरे तसेच सर्व प्राध्यापक उपस्थित होते. प्रा. ए.आर.चिक्काळे यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. जे.बी. कंदले यांनी आभार मानले.