माझ्या एका हाकेला एवढा मोठा जनसमुदाय गोळा झाला हाच जनतेचा विश्वास -- डॉ भाई बाबासाहेब देशमुख‌*

 *माझ्या एका हाकेला एवढा मोठा जनसमुदाय गोळा झाला हाच जनतेचा विश्वास -- डॉ भाई बाबासाहेब देशमुख‌*



प्रामाणिकपणाची कास धरत कष्ट करणारी मानदेशातील ही सांगोला तालुक्यातील भूमी खऱ्या अर्थाने संघर्ष करणाऱ्या लढवय्या योध्याची भूमी आहे. या मातीला ऐतिहासिक वारसा आहे. सत्यशोधक विचारांचा स्पर्श आहे म्हणून तर ही माती जातीपातीच्या द्वेषाला कधी बळी पडली नाही.पुढेही पडणार नाही. मान असो की कोरडा, अप्रुका असो की बेलवण...या नद्यांनी केवळ इथली माती आणि शेती समृद्ध केली नाही तर या नद्यांच्या खोऱ्यातील प्रत्येक माणूस संवेदनशील बनवला, लढवय्या बनवला अन पाण्यासारखा निर्मळही बनवला. तीच माणसं या मातीसाठी, या तालुक्यासाठी खऱ्या अर्थाने राबली,झिजली.. पाहिले आमदार केशवराव राऊत, स्व.आबासाहेब, आलेगावचे पांडुरंग भांबुरे, जवळ्याचे काकासाहेब साळुंखे-पाटील, नाझऱ्याचे वसंतराव पाटील, अकोल्याचे जगन्नाथ तात्या लिगाडे, मेडशिंगीचे संभाजीराव उर्फ दादासाहेब शेंडे यासारख्या दूरदृष्टी असणाऱ्या कर्तृत्ववान माणसांनी हा तालुका उभा केला. त्याला एक राजकीय, सामाजिक,प्रशासकीय अधिष्ठान दिलं. आताच्या लोकप्रतिनिधीनी मात्र हे वैचारिक वैभव पार धुळीस मिळवून ठेवलं आहे. खरं तर आज इतक्या चांगल्या कार्यक्रमात मला त्यावर बोलायचं नव्हतं; पण, सर्वसामान्य नागरिकांना विद्यमान लोकप्रतिनिधी आणि त्यांचे बगलबच्चे खुलेआम त्रास देत असताना मी बघत बसणार नाही. अरे,आबासाहेबांच्या काळात फाटक्यातल्या फाटक्या माणसालाही चिरीमिरी मागायचे धाडस कोणत्या सरकारी कार्यालयात कधी कधी झालं नाही. नियमात असणारे एक काम कधी कोणत्या अधिकाऱ्यानं अडवलं 

 नाही.तुम्ही चुकून सत्तेवर आलात तर पहिल्या दिवसापासून लोकांच्या खिशात हात घालण्यापर्यँत तुमची मजल गेली. तुमच्या चेल्या चपट्यानी तर उच्छाद मांडला आहे. टक्केवारीने या तालुक्यातील ठेकेदार गुबगुबीत करण्याचं महापाप तुम्ही करताय,त्यामुळे ही जनता तुम्हाला माफ करणार नाही. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत याचा चोख हिशोब नक्की होईल. तालुक्यातील सर्व नद्या, ओढे यातील वाळूवर तुम्ही आणि तुमची पिलावळ पोसली आहे. यामुळे गेल्या चार वर्षात नदीकाठच्या शेतकऱ्यांची माती करण्याचं पाप तुम्ही केलंय. एकीकडे तालुक्यातील जनतेला पै पै पैशासाठी संघर्ष करावा लागत असताना तुमचे कोट्यवधी रुपयांचे बंगले आले कुठून? हिम्मत असेल तर याचे उत्तर द्या. डिझेल टाकायलाही माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून तुमीच तालुकाभर सांगत सुटला होता. मग गेल्या चार वर्षात असा कोणता उद्योग तुम्ही उभारला की तुमच्याजवळ कोट्यवधी रुपयांच्या गाड्या, बंगले आले. सर्वसामान्य माणसांची घोर फसवणूक करतच तुम्ही हे इमले उभारलेत हे वेगळे सांगण्याची गरज नाही. खरं तर आज तालुका दुष्काळाच्या गर्द छायेत आहे. अनेक गावे पाण्यावाचून त्रासली आहेत. पिके वाळत आहेत. शेतीमालाला भाव नाही,डाळिंबावर किडीचा प्रादुर्भाव झाल्याने खर्चही निघत नाही अशी अवस्था आहे. सरकार पीक विमा काढा म्हणून शेतकऱ्यांना तगादा लावते. पण, तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना विम्याची रक्कम भरूनही विमा मिळालेला नाही. शेतकऱ्यांची ही दिवसा ढवळ्या लूट सुरू असताना आपले बोलबच्चन लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प आहेत. गेल्या चार वर्षात यांनी अधिवेशनात एक प्रश्न उपस्थित केलेला नाही. माध्यमांचे बुम दिसले की केवळ प्रसिद्धी मिळते म्हणून हे तोंड उघडतात. तालुक्यातील एकाही प्रश्नावर यांनी तोंड उघडलेले नाही. मुळात आपले प्रश्न काय आहेत, ते कुणाकडे मांडायला हवेत याबाबत हे महाशय प्रचंड अज्ञानी आहेत. अधिकाऱ्यांसमोर एखादा विषय मांडताना यांची तत फफ होते. त्यामुळे तुम्ही काय आहात यावर उघडायला लावू नका. झाकली मूठ सव्वा लाखाची राहू द्या. ती उघडली तर तुमची कुवत तालुक्यातील जनतेला कळेल. गेल्या चार वर्षात या तालुक्यातील गाव ना गाव मी फिरतोय. शेतकऱ्यांना भेटलो, माझ्या शेकापच्या कार्यकर्त्यांना भेटलो. खरं तर त्यांची मते, अनुभव जाणून घेताना प्रत्येक ठिकाणी आबासाहेब यांची आठवण काढली जात होती. त्यांचे विचार किती महत्त्वाचे होते याची प्रकर्षाने जाणीव झाली. तरुणांना रोजगार, चांगले शिक्षण, उत्तम आरोग्य व्यवस्था, नागरिकांना भौतिक सुविधा, अन इंच ना इच जमिनीला पाणी हाच माझा अजेंडा आहे. तो मी पुढे घेऊन जात आहे. आमदारकीला काय होईल, कोण उमेदवार असेल मला माहित नाही. शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा या तालुक्यात पुन्हा फडकला पाहिजे हे एकच ध्येय घेऊन मी काम करतोय. तेच माझ्या डोळ्यासमोर आहे. ग्रामपंचायत सदस्यपासून ते आमदारकीचा उमेदवार ठरवण्यापर्यंत या पक्षात एक शिस्त आहे. ती कधीच मोडलेली नाही. पक्ष जो उमेदवार ठरवेल त्याला निवडून आणायचे हे माझे कर्तव्य आहे. अन ते मी पार पडणार. या तालुक्यातील जनतेने आबासाहेब यांना सात वेळा गुलाल लावला. याची उतराई होणे शक्य नाही. तो विजयाचा गुलाल आबासाहेब यांनी आपल्या निष्कलंक चारित्र्याने जपला. त्यामुळे गद्दाराना विजयाच्या गुलालाचे महत्त्व काय कळणार. आज माझ्या एका हाकेवर इतका मोठा जनसमुदाय जमला..तालुक्यातील कानाकोपऱ्यातुन माझा कार्यकर्ता या मेळाव्याला स्व खर्चाने आलाय हाच जनतेचा विश्वास आहे त्यास मी तडा जाऊ देणार नाही..आणि ह्या गर्दीतुन जनतेने काय उत्तर दिले आहे ते ही विरोधकांनी समजुन घ्यावे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad