स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी घेतला प्रधानमंत्री ‘उच्चतर शिक्षा अभियानाच्या' थेट प्रक्षेपणाचा आनंद
विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच मिळाली जम्मु-काश्मीर बाबतची माहिती
पंढरपूर - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरला प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान अंतर्गत असणाऱ्या ‘मेरू’ या योजनेच्या माध्यमातून रु. १०० कोटी एवढे अनुदान नुकतेच मंजूर झाले आहे. त्या अनुषंगाने सोलापूर विद्यापीठाच्या परीपत्रकानुसार आज मंगळवार, दि. २० फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ११:३० ते १.३० या कालावधीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान (पीएम-युएसएचए)’ हा प्रकल्प व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लॉन्च करण्यात आला. या निमित्ताने स्वेरीतील विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शैक्षणिक व सामाजिक विचार वर्गात बसून तन्मयतेने ऐकले. यातून उच्च शिक्षणाच्या माहिती बरोबरच विद्यार्थ्यांना जम्मु काश्मीर या राज्यातील विविध विकासकामे आणि कलम ३७० संबंधित विविध बाबींची माहिती मिळाली.
कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग व कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये एल.सी.डी. प्रोजेक्टरद्वारे उच्चशिक्षण प्रकल्पाबरोबरच जम्मु काश्मीर या राज्यातील ‘विकसित भारत’ या कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणाचे आयोजन केले होते. स्वेरीचा इंटरनॅशनल कॉन्फरन्स हॉल, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट हॉल तसेच अभियांत्रिकी व फार्मसीच्या प्रत्येक वर्गामध्ये हा थेट प्रक्षेपण कार्यक्रम पाहण्याची सोय करण्यात आली होती. पंतप्रधान मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उच्चशिक्षण क्षेत्रातील प्रगती, नवनवीन अभ्यासक्रम, त्याला दिलेला निधी, लखपती दिदी तसेच जम्मु काश्मीर राज्यातील विकसित झालेल्या भागातील माहिती या कार्यक्रमातून दिली. या अभियानाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांनी उच्च शिक्षण या विषयाकडे सर्वांचे लक्ष वेधले तसेच जम्मु काश्मीर राज्यातील ३७० कलम हटविल्यानंतर झालेला विकास तसेच भारताचा विकास होण्याच्या दृष्टीने युवकांचे कार्य यावर प्रकाश टाकला. भारताच्या विकासाच्या दृष्टीने पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या जवळपास अर्धा तास भाषणात अत्यंत महत्वपूर्ण विचार मांडले. या ‘उच्चतर शिक्षा अभियान’ या उपक्रमाचा लाभ अभियांत्रिकीच्या व फार्मसीच्या प्रथम वर्षापासून ते अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी व जम्मु काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिंह यांच्या महत्वाच्या विचारांमुळे स्वेरीच्या विद्यार्थ्यांच्या ज्ञानात नक्कीच भर पडली. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ.एम.एम.पवार बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ. मिथुन मणियार, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ.महेश मठपती यांच्या सहकार्याने सर्व विभागप्रमुख व वर्गशिक्षक यांच्या नेतृत्वाखाली प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी तसेच अभियांत्रिकी व फार्मसीचे विद्यार्थी या थेट प्रक्षेपण कार्यक्रमासाठी उपस्थित होते.