स्वेरीत ‘अभियांत्रिकी शिक्षणाचे महत्त्व’ या विषयावर मार्गदर्शन सत्र संपन्न
आयआयटी मुंबई चे संचालक प्रा.डॉ. सुभाषिश चौधरी यांचे बहुमोल मार्गदर्शन
पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये संशोधन विभागांतर्गत प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मध्ये ‘अभियांत्रिकी शिक्षणाचे महत्त्व’ या विषयावरील मार्गदर्शन सत्र नुकतेच संपन्न झाले. त्या अनुषंगाने आयआयटी, मुंबई चे संचालक प्रा. डॉ. सुभाषिश चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
दीपप्रज्वलनानंतर स्वेरीचे युवा विश्वस्त प्रा.सुरज रोंगे यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. प्रास्तविकात शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार यांनी या कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. प्रा. डॉ. सुभाषिश चौधरी हे आपल्या मार्गदर्शनातून ‘मूलभूत अभियांत्रिकीचे महत्त्व’ याबद्दल सविस्तर माहिती देताना म्हणाले की, ‘तुम्ही स्वतःचा स्पेस शोधा, स्वतःच्या क्षमता व कमतरता ओळखा. आपल्या कमतरता कशा कमी करता येतील आणि क्षमता भक्कम कशा होतील यावर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करा व त्यासाठी पाठपुरावा करा. अभ्यास करताना अनावश्यक गोष्टींवर बंधने घालावीत आणि त्यामुळेच ध्येय साध्य करताना आपल्यामध्ये एकाग्रता निर्माण होईल. त्यामुळे यश देखील लवकर मिळेल. इंजिनिअरिंगमध्ये संशोधन आणि निरीक्षण या खूप महत्त्वाच्या बाबी असतात. मूलभूत अभियांत्रिकीचा उपयोग करूनच अत्याधुनिक साधने तयार केली जातात कारण विज्ञानाचा मूळ पाया हा निरीक्षणच आहे. त्यामुळे प्रायोगिक पद्धती वापरून वेगवेगळ्या स्वरूपाचे संशोधन करावे लागते.’ असे सांगून डॉ. सुभाषिश चौधरी यांनी अभियांत्रिकी शिक्षणाचे महत्व विशद केले. यावेळी श्रेयस कांबळे, ऋतुराज कोरे यांच्यासह इतर विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकीच्या संदर्भात अनेक प्रश्न विचारले. त्या प्रश्नांना डॉ. चौधरी यांनी समर्पक उत्तरे दिली. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजिलेल्या या कार्यक्रमात संशोधन विभागाचे अधिष्ठाता डॉ. अमरजित केने, प्लेसमेंट विभागाचे प्रा. अविनाश मोटे, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ.मिनाक्षी पवार, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ.दीप्ती तंबोळी, डॉ. हर्षवर्धन रोंगे, तसेच इतर प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. संस्थेचे युवा विश्वस्त प्रा.सुरज रोंगे यांनी आभार मानले.