स्वेरीचे माजी विद्यार्थी दशरथ लवटे यांची भारत सरकारच्या जलशक्ती विभागात
कनिष्ठ अभियंता (वर्ग २) पदी निवड
स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे प्रशासकीय क्षेत्रात निवड
पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विभागातून उत्तीर्ण झालेले स्वेरीचे माजी विद्यार्थी दशरथ पांडुरंग लवटे यांची भारत सरकारच्या जलशक्ती विभागात कनिष्ठ अभियंता (वर्ग २) पदी निवड करण्यात आली आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये केंद्र सरकारच्या स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत घेण्यात आलेल्या या स्पर्धा परीक्षेत ऑल इंडिया रँक (एआयआर) मध्ये ५४ व्या क्रमांकाने त्यांनी उज्वल यश संपादन केले आहे. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अत्यंत ग्रामीण भाग असलेल्या कौठाळी (ता.पंढरपूर) येथील रहिवासी असलेले पांडुरंग व सौ.शोभा या लवटे दांपत्यांना दोन मुले आहेत. पांडुरंग लवटे हे शेती करत असून त्यांना लहान मुलगा अतुल हा शेत कामात मदत करतो. सौ. शोभा लवटे हया गृहिणी आहेत. मोठा मुलगा दशरथ याने उच्च शिक्षण घेवून प्रशासकीय क्षेत्रात सेवा द्यावी हे लवटे दाम्पत्यांनी स्वप्न पाहिले. आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने थोरला मुलगा दशरथ याने परिश्रम करण्याचे ठरविले. प्राथमिक शाळा कौठाळीतून तर दहावीपर्यंतचे शिक्षण राहुल गांधी विद्यालय, कोर्टी मधून पूर्ण केले. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधून त्यांनी डिप्लोमा पूर्ण केला. त्यानंतर त्यांनी स्वेरीच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागामध्ये थेट द्वितीय वर्षात प्रवेश मिळविला. पदवीच्या तिन्ही वर्षात त्यांनी स्वेरीच्या वसतिगृहात राहून अभ्यास केला. स्वेरीमध्ये पदवीच्या तिसऱ्या व चौथ्या वर्षातील विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा पुरेपूर फायदा त्यांनी घेतला. त्यातून स्पर्धा परीक्षा संदर्भ पुस्तके हाताळली. महत्वाच्या नोट्स काढल्या आणि अभ्यास सुरु ठेवला. सुरुवातीपासून हुशार असणारे दशरथ यांची इंजिनिअरिंग पूर्ण होण्यापूर्वीच अंतिम वर्षात असताना कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून बेंगलोरच्या ‘त्रिवेणी टर्बाईन’ या नामांकीत कंपनीमध्ये निवड झाली. कंपनीत काम करत असताना देखील त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरूच ठेवली. अखेर केंद्र सरकारच्या स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत ऑक्टोबर २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून त्यांची भारत सरकारच्या केंद्रीय जल आयोग, जलशक्ती विभाग, मंत्रालय मध्ये कनिष्ठ अभियंता ‘वर्ग-२’ या पदावर पहिल्याच प्रयत्नात निवड झाली. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी रोंगे यांच्यासह इतर प्राध्यापकांचे तसेच शिक्षक असलेले त्यांचे चुलते लक्ष्मण लवटे यांचेही बहुमोल मार्गदर्शन लाभले. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी रोंगे यांच्या हस्ते दशरथ लवटे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डिप्लोमा इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभागाप्रमुख डॉ. श्रीकृष्ण भोसले, वसतिगृह व्यवस्थापक प्रा.करण पाटील, प्रा. पोपट आसबे, प्रा. दिगंबर काशिद यांच्यासह इतर प्राध्यापक उपस्थित होते. दशरथ लवटे हे एवढ्या परीक्षेवरच थांबणार नसून पुढे इंडियन इंजिनिअरिंग सर्विसेस (आयईएस) मध्ये देखील यशस्वी होण्यासाठी त्यांनी तयारी सुरु ठेवली असल्याचे आवर्जून सांगितले. दशरथ लवटे यांना मिळालेल्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख तसेच संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम.पवार, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी अभिनंदन केले आहे.