संत गाडगेबाबा हे चालते बोलते विद्यापीठ होते -रा.से.यो.चे सल्लागार डॉ. आर. एन. हरीदास
स्वेरीमध्ये संत गाडगेबाबा जयंती साजरी
पंढरपूर- ‘महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. राज्याला अनेक थोर संतांची परंपरा लाभलेली आहे. त्यापैकीच एक महान संत म्हणजे संत गाडगे महाराज होय. लोक त्यांना 'गाडगे बाबा’ म्हणून देखील ओळखत असत. एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक अशी त्यांची ओळख होती. अत्यंत साधेपणा, गरिबी, अंगावर फाटके तुटके परंतु स्वच्छ असणारे कपडे असे गाडगे बाबांचे राहणीमान होते. गाडगे महाराजांना सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त आवड होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भेटी देत असत. अनाथ, अपंग, दरिद्री व दुःखी लोक हेच त्यांचे दैवत होते. रंजल्या- गांजलेल्यांची सेवा हीच गाडगेबाबांची देवपूजा असायची. अंधश्रद्धा दूर करण्यासाठी त्यांनी सातत्यने प्रयत्न केले. लोकजीवन तेजाने उजळण्यासाठी हाती झाडू, खराटा घेवून गावोगावी ते पायी जात असत. दिवसा गाव स्वच्छ करायचे आणि रात्री ते कीर्तन करून जनजागृती करायचे. त्यामुळे संत गाडगेबाबा हे चालते बोलते विद्यापीठच होते.’ असे स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग च्या राष्ट्रीय सेवा योजनेचे सल्लागार डॉ. आर.एन. हरीदास यांनी केले.
गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्युट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्या वतीने संत गाडगेबाबा यांची १४८ वी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी डॉ. हरीदास हे मार्गदर्शन करत होते. प्रारंभी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी डॉ. हरीदास यांनी संत गाडगेबाबा यांच्या जीवनकार्याचे महत्व सांगितले. स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम. पवार यांच्या सहकार्याने प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ.एस.ए.लेंडवे, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. एम. एस. मठपती, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.आर.एस.साठे, डॉ.डी.एस.चौधरी, डॉ. एम.एम. आवताडे, मृणाली माने, अक्षय माने इतर समन्वयक प्राध्यापक व विद्यार्थी आदी उपस्थित होते. प्रा. आर. पी. नागणे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.