युवकांनी सामाजिक प्रश्नांची उत्तरे शोधणे गरजेचे - अभाविप पूर्व प्रदेश संघटन मंत्री अभिजित पाटील स्वेरीमध्ये ७५ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा


युवकांनी सामाजिक प्रश्नांची उत्तरे शोधणे गरजेचे

                                                                 - अभाविप पूर्व प्रदेश संघटन मंत्री अभिजित पाटील

स्वेरीमध्ये ७५ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा



पंढरपूरः ‘विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, वीर, लढवय्या योद्धा यांचे योगदान लाभल्यामुळे भारताने प्रजासत्ताक दिनाची ७५ वर्षे यशस्वीपणे पूर्ण केली आहेत. यामध्ये ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिले त्यांच्याकडे आपण जर आणखी अपेक्षेने पाहू लागलो तर आपली प्रगती अजून खुंटते. यासाठी युवकांनी आपल्या आणि समाजाच्या प्रगतीसाठी योगदान देणे आवश्यक आहे. आपल्याला मिळणाऱ्या शिक्षणातून समाजाला समृद्ध बनवण्याचे मार्ग शोधले पाहिजेत. स्वतःसाठी गाडी, जमीन, बंगला मिळवण्याच्या नादात अलीकडे सामाजिक संवेदना कमी होत आहे. म्हणून सध्याच्या युवकांनी सामाजिक प्रश्नांची उत्तरे शोधणे गरजेचे आहे.’ असे प्रतिपादन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्व प्रदेश संघटन मंत्री अभिजित पाटील यांनी केले.  

         गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात भारताचा ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्व प्रदेश संघटन मंत्री अभिजित पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. भारतमातेच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाला सुरवात झाली. विद्यार्थी निखील देवकर, गायत्री जाधव व सोनाली करवीर यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त केलेल्या भाषणातून भारताची वस्तुस्थिती, युवकांवरील जबाबदारी, भारतीय संस्कृती, शिक्षण, आरोग्य, क्रीडा आदी विषयावर उत्तम पद्धतीने विचार मांडले. यंदाच्या वर्षी एमपीएससी, युपीएससी या स्पर्धा परीक्षेत यश मिळविलेल्या स्वेरीच्या माजी विद्यार्थ्यांचा तसेच क्रीडा, संशोधन प्रकल्प यामध्ये यश मिळविलेल्या स्वेरीच्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. प्रमुख पाहुणे पूर्व प्रदेश संघटन मंत्री अभिजित पाटील पुढे म्हणाले की, 'सध्या रस्त्यावरच्या अपघातांची संख्या वाढली आहे. हे अपघात कसे कमी करता येतील यावर आणि यासारख्या अनेक सामाजिक प्रश्नांवर देखील युवकांनी संशोधन करणे आवश्यक आहे. तसेच आपल्या समाजासमोर अनेक प्रकारच्या समस्या उभ्या आहेत. त्या युवकांनी सोडवणे आवश्यक आहे. आपण यशस्वी होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे योजना आखतो त्याप्रमाणे समाजातील आव्हाने सोडविण्यासाठीही योजना आखून त्याचा पाठपुरावा करावा.’ असे आवाहन करून रामायणात जटायू पक्ष्याचे जीवन हे रावणापेक्षा कसे सार्थक झाले? याचे सुंदर विवेचन केले. एकूणच विद्यार्थ्यांनी राष्ट्र उभारणीच्या कार्यात नवनवीन संकल्पना घेऊन पुढे आले पाहिजे असे त्यांनी सांगितले. यावेळी स्वेरी अंतर्गत असलेल्या अभियांत्रिकी (पदवी व पदविका) तसेच फार्मसी (पदवी व पदविका) महाविद्यालयातील सर्व विभागांच्या न्यूज बुलेटीनचे स्वतंत्ररित्या प्रकाशन करण्यात आले. तसेच सर्वांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचनही केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, युवा विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम. पवार, बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. एम.जी. मणियार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.एन.डी.मिसाळ, रजिस्ट्रार राजेंद्र झरकर, बालाजी सुरवसे, मधुकर मोरे, सर्व अधिष्ठाता, सर्व विभागप्रमुख, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व चारही महाविद्यालयांचे विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रिया कारंडे, दत्तात्रय आहेरवाडी व सांस्कृतिक कार्यक्रमाचे विभागप्रमुख डॉ.यशपाल खेडकर यांनी केले तर मिठाई वाटपाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad