स्वेरी विद्यार्थ्यांच्या पंखात तंत्रज्ञानाचे बळ देते -पी.डी. ए. कॉलेजचे विभागप्रमुख डॉ.मृत्युंजय असापल्ली स्वेरीत राष्ट्रीय परिषदेचे थाटात उदघाटन


स्वेरी विद्यार्थ्यांच्या पंखात तंत्रज्ञानाचे बळ देते

                                                                            -पी.डी. ए. कॉलेजचे विभागप्रमुख डॉ.मृत्युंजय असापल्ली

स्वेरीत राष्ट्रीय परिषदेचे थाटात उदघाटन



पंढरपूर- ‘स्वेरीतील वातावरण अभ्यासपूरक असल्यामुळे आणि स्वेरीचे नेतृत्व देखील भक्कम असल्यामुळे येथील विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल आहे. स्वेरीत विद्यार्थ्यांसाठी सर्व आवश्यक सोयी सुविधा आहेत. या सुविधांचे विद्यार्थ्यांना सोने करता आले पाहिजे. स्वेरीत विद्यार्थांच्या शिक्षणासाठी होणारे प्रयत्न, विद्यार्थ्यांच्या विकासासाठी आयोजित केले जाणारे उपक्रम याद्वारे स्वेरी विद्यार्थ्यांच्या पंखाना बळ देण्याचे कार्य अविरतपणे करत आहे. फक्त विद्यार्थ्यांनी उंच भरारी घेण्याची तयारी ठेवावी.’ असे प्रतिपादन कलबुर्गी मधील पी.डी.ए. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ.मृत्युंजय असापल्ली यांनी केले.

         बिदर (कर्नाटक) मधील गुरुनानक देव इंजिनिअरिंग कॉलेज, द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स आणि स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्या संयुक्त विद्यमाने गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये दि.२४ जानेवारी ते दि.२५ जानेवारी २०२४ या दोन दिवशी आयोजिलेल्या राष्ट्रीय परिषदेच्या पहिल्या दिवशी उदघाटन प्रसंगी डॉ.असापल्ली हे मार्गदर्शन करत होते. अध्यक्षस्थानी स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे हे होते. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग व एमबीए या चार विभागातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांसाठी या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. दीप प्रज्वलानंतर एमबीएचे विभाग प्रमुख प्रा.के.बी.पाटील यांनी दोन दिवस चालणाऱ्या या राष्ट्रीय परिषदेविषयी माहिती दिली. स्वेरीचे युवा विश्वस्त प्रा. सुरज रोंगे यांनी ‘स्वेरीच्या स्थापनेपासून ते आतापर्यंतची यशस्वी शैक्षणिक वाटचाल सांगून विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी मानून सुरु असलेली स्वेरीची वाटचाल, संशोधन, प्लेसमेंटच्या माध्यमातून नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या व प्लेसमेंट करिता येणाऱ्या कंपन्या, वसतिगृह सुविधा, स्वेरीच्या भेटीसाठी बाहेरून येणाऱ्या महाविद्यालयाचे स्टाफ आदी बाबत सविस्तर माहिती दिली. गुरुनानक देव इंजिनिअरिंग कॉलेजच्या कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे विभागाचे प्रमुख डॉ. अनुराधा अंन्नीगेरी म्हणाल्या की, ‘ज्यावेळी मी स्वेरीच्या कॅम्पसमध्ये पाऊल ठेवले, येथील प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे प्रफुल्लीत चेहरे पाहिले तेंव्हा मला एक वेगळा उत्साह जाणवला. ती ऊर्जा जबरदस्त होती. नैसर्गिक देणगी, अभ्यासासाठी होत असलेले कठोर परिश्रम, विद्यार्थ्यामध्ये असलेली शिस्त, प्राध्यापकांची शिकवण्याची पद्धत या सर्व बाबी पाहिल्या असता स्वेरीमध्ये विद्यार्थ्यांचे करिअर उज्वल होत असल्याचे दिसून आले. विद्यार्थ्यांच्या यशासाठी स्वेरीचे योगदान आणि नियोजन हे सर्वोत्तम आहे हे देखील जाणवते. स्वेरीच्या संशोधन विभागाचे अधिष्ठाता डॉ.ए.पी.केने यांनी स्वेरीच्या संशोधन विभागाची वाटचाल, आविष्कार संशोधन महोत्सवात मिळालेले यश, प्राप्त झालेला संशोधन निधी आणि त्यावर सुरु असलेले संशोधन प्रकल्प याबाबत माहिती दिली. गुरुनानक देव इंजिनिअरिंग कॉलेजच्या इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे विभागप्रमुख डॉ.किशन सिंग म्हणाले की, 'स्वेरीने कमी वेळेमध्ये खूप मोठी भरारी मारली आहे. या यशामागे प्राचार्य डॉ. रोंगे सरांचे भक्कम नेतृत्व कारणीभूत आहे. विद्यार्थी स्वप्न पाहतात आणि ते स्वप्न स्वेरीचे प्राध्यापक वर्ग पूर्ण करतात याचा अभिमान वाटतो' असे सांगून एनबीए, नॅक व ऑटोनॉमस मानांकन मिळाल्यामुळे स्वेरीचा गौरव केला. अध्यक्षस्थानावरून बोलताना स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे म्हणाले की, ‘विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी असलेल्या या महत्वपूर्ण राष्ट्रीय परिषदेत सर्वांनी मनापासून सहभागी व्हावे. ही परिषद बहुविद्याशाखीय असून यात विज्ञानापासून ते अभियांत्रिकी व तंत्रज्ञाना पर्यंत विविध विषयांचा समावेश आहे.’ असे सांगून त्यांनी सर्व उपस्थितांना या परिषदेत सहभागी होण्याचे आवाहन केले. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ.एम.एम.पवार, कॉम्प्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ.एस.पी.पवार, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ.डी.ए.तंबोळी व एमबीएचे विभाग प्रमुख प्रा.के.बी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली व प्राध्यापकांच्या सहकार्याने ही दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. या परिषदेत देशातील विविध इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी यांनी सहभाग घेतला आहे. यावेळी डॉ. महंमद भाकर, डॉ. प्रमिला पाटील, डॉ. पवनकुमार मंकल, प्रा.दीपक होडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ.नीता कुलकर्णी यांनी केले तर विद्यार्थी अधिष्ठाता डॉ.एम.एस.मठपती यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad