स्वेरीतील विद्यार्थी आकाशातील नक्षत्रांप्रमाणे -गीतकार प्रवीण दवणे स्वेरीत ‘दीपस्तंभ मनातले जनातले’ हा कार्यक्रम संपन्न


स्वेरीतील विद्यार्थी आकाशातील नक्षत्रांप्रमाणे -गीतकार प्रवीण दवणे


स्वेरीत ‘दीपस्तंभ मनातले जनातले’ हा कार्यक्रम संपन्न



पंढरपूर- ‘सर्वच ठिकाणी शिक्षण दिले जाते परंतु स्वेरीमध्ये आल्यावर कॅम्पस पाहून असे जाणवले की, या ठिकाणी शिक्षणाबरोबरच एक परिपूर्ण माणुस घडवणारे शिक्षण दिले जाते. कॅम्पसमध्ये दुतर्फा लावलेले परीक्षांचे निकाल, प्लेसमेंटच्या माध्यमातून नोकरीला लागलेल्या विद्यार्थ्यांची मोठी आकडेवारी, मानांकने, संशोधनांची यादी त्याचबरोबर डिप्लोमाकडे अत्यंत शिस्तबद्ध चाललेली मुलांची वर्दळ तर डिग्रीकडे विद्यापीठाच्या परीक्षेमुळे असलेली सामसूम, खरंच या सर्व बाबी कौतुकास्पद आहेत. उत्तम व्यवस्थापन आणि समृद्ध माणूसकी असेल तर असे यश सहज शक्य होऊ शकते. एवढे यशस्वी होण्यासाठी स्वेरी परिवाराने प्रचंड योगदान दिले असणार हे मात्र नक्की! स्वेरीमध्ये करुणा, प्रेम याच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांवर माणुसकीचे संस्कार घडविले जातात. येथील शिस्तबद्ध विद्यार्थी पाहिले असता ते आकाशातील नक्षत्रांप्रमाणे वाटतात.’ असे प्रतिपादन प्रसिद्ध गीतकार प्रवीण दवणे यांनी केले.

       गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथे श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पॉलिटेक्निक) मध्ये राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या ४२५ व्या व स्वामी विवेकानंद यांच्या १६० व्या जयंतीचे औचित्य साधून ‘पालवी-संस्कार-सेतू, संस्कार-विचार-राष्ट्रनिर्मिती’ द्वारा ‘दीपस्तंभ मनातले जनातले’ या विषयावर सुप्रसिद्ध गीतकार प्रवीण दवणे हे आपले विचार व्यक्त करत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे हे होते. प्रास्ताविकामध्ये पालवीच्या सौ. डिंपल घाडगे यांनी ‘स्वेरीचे सचिव डॉ.रोंगे सरांनी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबरोबरच माणुसकी कशी रुजवली? हे सांगून ‘पालवी’ या संस्थेच्या २२ वर्षांच्या वाटचालीतील महत्वाचे टप्पे सांगितले. त्याचबरोबर स्वेरीमध्ये ‘दीपस्तंभ मनातले जनातले’ या कार्यक्रमाच्या आयोजनाचा हेतू स्पष्ट केला. सर्वप्रथम संस्थेचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी पाहुण्यांचे स्वागत करून स्वेरीच्या २५ वर्षांच्या वाटचालीतील महत्वाचे टप्पे, मिळालेली मानांकने, विद्यार्थ्यांसाठी असलेल्या सोई सुविधा व शैक्षणिक उपक्रम यासंबंधी माहिती दिली. पुढे बोलताना गीतकार दवणे म्हणाले की,’ स्वेरीतील विद्यार्थ्यांच्या रूपाने असलेल्या तरुणाईला इंग्रजी भाषा उत्तम येते आणि आली ही पाहिजे, परंतु हे करत असताना आपल्या मातृभाषेवरही तितकेच प्रेम असले पाहिजे. इंग्रजी भाषेचा जरूर आदर करा, सन्मान करा पण आपल्या मातृभाषेचा देखील मनसोक्त आनंद घेता आला पाहिजे. जगण्याच्या आनंदात आपली मातृभाषा सर्वदूर पोहचली पाहिजे. अभियंता हे घर, मोठमोठ्या इमारती बांधतातच पण त्याचबरोबर सध्या ‘माणूस बांधणे’ हे देखील आपले कर्तव्य आहे. कारण मातृभाषेचा आनंद हा चेहऱ्यावर सौंदर्य फुलवतो. विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या तणावाखाली दबून न जाता आपल्या आयुष्यामध्ये आलेल्या संघर्षाच्या वादळांना भेदून यशाचा मार्ग निर्माण केला पाहिजे' असे सांगून माणसं का मोठी होतात, हे सांगताना त्यांनी ‘माझ्या छकुला’ हे गीत गाण्याच्या वेळी लतादीदींच्या सहवासातील हृदयस्पर्शी घटना सांगितली. एकूणच वेळेचे व्यवस्थापन हेच आयुष्याचे व्यवस्थापन असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. यावेळी गीतकार प्रवीण दवणे यांनी पालवीतील चिमुकल्या मुलांनी आपल्या कोवळ्या हातांनी बनवलेल्या विविध व आकर्षक वस्तूंचे भरभरून कौतूक केले आणि पालवी संस्थेच्या कार्याचा विशेष गौरव केला. यावेळी त्यांनी लिहलेली आणि गाजलेली काही गीते सादर केली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पालवीचे आशिष शहा व स्वेरी पॉलिटेक्निकचे प्रा.आकाश पवार, प्रा.जगताप व इतर प्राध्यापकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अजिंक्य देशमुख यांनी केले तर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पॉलिटेक्निक) चे प्राचार्य डॉ.एन. डी. मिसाळ यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad