*देशाला उद्योजकता विकासाची गरज- डाॅ. बाळासाहेब गंधारे*
पंढरपूर: प्रतिनिधी
उद्योजकता विकास ही संरचित प्रशिक्षण आणि संस्था निर्माण कार्यक्रमाद्वारे उद्योजकीय कौशल्ये आणि ज्ञान वाढविण्याची प्रक्रिया आहे. नवीन उपक्रम ज्या गतीने वाढविले जातात. त्याच गतीने उद्योजकांचा पाया वाढविणे आवश्यक आहे. उद्योजक होत असताना अनेक आव्हाने पेलावी लागतात. मनांमध्ये जिद्द, धडपड, आवड, निवड आणि कौशल्य या गोष्टी आवश्यक असतात. उद्योग सुरू करीत असताना तो सुरू करणे सोपे असते परंतु ते टिकविणे खुप अवघड असते. यासाठी नियोजन खुप महत्त्वपूर्ण असते. वाढती बेकरी व तरूणांच्या हाताला काम मिळवायचे असेल अन् बेकारी कमी करायची असेल तर देशाला उद्योजकतेशिवाय पर्याय नाही. उद्योजकता हिच देशाचा विकास करू शकेल असे मत प्राध्यापक डाॅ. बाळासाहेब गंधारे यांनी कोर्टी येथील राहुल गांधी माध्यमिक विद्यालयात बोलताना व्यक्त केले.
कोर्टी येथील राहुल गांधी माध्यमिक विद्यालयात १२ वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी "उद्योजकता विकास" या विषयावर डाॅ. बाळासाहेब गंधारे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
यादरम्यान राहुल गांधी माध्यमिक विद्यालयाच्या वतीने डाॅ. बाळासाहेब गंधारे व प्रा. प्रदीप व्यवहारे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्रा. रामचंद्र कोडंलकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्राचार्य शिंदे यांनी मानले. या व्याख्यानात विद्यालयातील ५० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राहुल गांधी माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.