स्वेरीमध्ये ‘अॅडव्हान्स्ड इंडस्ट्रीयल अॅटोमेशन’ या विषयावर कार्यशाळा संपन्न
‘स्वेरी’ व ‘इंडवेल ऑटोमेशन, मंगळूर’ यांच्यामध्ये सामंजस्य करार
पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील इलेक्ट्रॉनिक्स अँड अँण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विभागाच्या वतीने दि.२५ सप्टेंबर २०२३ ते ०५ ऑक्टोबर २०२३ या दरम्यान 'अॅडव्हान्स्ड इंडस्ट्रीयल अॅटोमेशन’ या विषयावर दहा दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
स्वेरी नेहमीच विद्यार्थांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करत असते. त्याचाच एक भाग म्हणून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या दिशादर्शक मार्गदर्शनाखाली, स्वेरीच्या ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाच्या सहकार्याने व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ.मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली आयोजिलेल्या या अभ्यासपूर्ण कार्यशाळेत विभागाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी व प्राध्यापकांनी सहभाग घेतला होता. या कार्यशाळेचे उदघाटन मंगरूळच्या इंडवेल ऑटोमेशनचे संस्थापक-ट्रेनर हिमांशु कुमार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी या कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना करिअरच्या दृष्टीने बहुमोल मार्गदर्शन केले. दीप प्रज्वलनानंतर प्रास्ताविकात विभागप्रमुख डॉ. मिनाक्षी पवार म्हणाल्या की, ‘विद्यार्थ्यांनी सॉफ्टवेअर सोबतच हार्डवेअर क्षेत्रातील ज्ञान आत्मसात करून त्यात आपले कौशल्य वाढविले तर भविष्यात याचा नक्की फायदा होतो.’ सलग दहा दिवस चाललेल्या या कार्यशाळेला विद्यार्थ्यांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना संबंधित विषयासंदर्भात तांत्रिक व मुलभुत तंत्रज्ञान ते आधुनिक तंत्रज्ञान यांचा प्रात्यक्षिकाद्वारे अनुभव करून देण्यात आला. कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पीएलसीची मुलभूत ओळख करून देण्यात आली तसेच विविध औद्योगिक तंत्रज्ञानाचा उपयोग यासंदर्भात अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले गेले. दुसऱ्या दिवशी प्रात्यक्षिक व पीएलसी मध्ये वापरणाऱ्या विविध इनपुट उपकरणांची व त्यासाठी आवश्यक सॉफ्टवेअरची ओळख करून दिली. तिसऱ्या दिवशी ‘एससीएडीए’ या विषयावर ‘मुलभुत प्रात्यक्षिके व त्याचा औद्योगिक क्षेत्रात होणारे उपयोग’ यावर मार्गदर्शन केले. चौथ्या दिवशी विद्यार्थ्यांनी एसी मोटर वापरून छोटे प्रयोग करून दाखविले. पाचव्या दिवशी ‘एचएमआय चे उपयोग’या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. सहाव्या दिवशी कोडेसेस सॉफ्टवेअरची मुलभूत ओळख करून दिली. सातव्या दिवशी जी-एक्स सॉफ्टवेअरची ओळख करून त्याद्वारे लहान प्रकल्प तयार करण्यात आले. कार्यशाळेच्या नवव्या दिवशी एचएमआय व एमएमआयचा वापर करून विविध प्रकल्प तयार करण्यात आले. शेवटच्या अर्थात दहाव्या दिवशी कार्यशाळेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची झालेल्या कार्यशाळेवर परीक्षा घेण्यात आली. त्यातून विजेत्या व गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना कंपनीच्या कोअर क्षेत्रातील नोकरीच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत, याविषयी महत्वपूर्ण माहिती देण्यात आली. यावेळी कंपनीचे ट्रेनर हिमांशुकुमार यांनी स्वेरीतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे भरभरून कौतुक केले तसेच स्वेरीमध्ये होत असलेल्या विद्यार्थीपूरक विविध उपक्रमांचे कौतुक केले. याप्रसंगी ‘स्वेरी’ व ‘इंडवेल ऑटोमेशन मंगळूर’ यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. सदर कार्यशाळेत इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विभागातील जवळपास दीडशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यशाळेसाठी प्रा.सागर वाघचवरे यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले. सूत्रसंचालन दिशा भट्टड व कॅनी संतांनी यांनी केले तर वृषाली जानगवळी यांनी आभार मानले.