डॉ. विश्वासराव मोरे हे मानवतेचे एक भागीदार आहेत -जेष्ठ पत्रकार व संपादक बाळासाहेब बडवे स्वेरीत ‘लम्पी जनजागृती अभियाना’ चा समारोप

डॉ. विश्वासराव मोरे हे मानवतेचे एक भागीदार आहेत

                                                                                        -जेष्ठ पत्रकार व संपादक बाळासाहेब बडवे

स्वेरीत ‘लम्पी जनजागृती अभियाना’ चा समारोप



पंढरपूर- ‘आपल्या जीवनात ज्या सूक्ष्म विचारधारा असतात त्या विचारांची लकेर ज्या व्यक्तीमत्वाने निर्माण केली त्या पशुवैद्यक संघटनेचे अध्यक्ष डॉ.विश्वासराव मोरे, ज्यांनी माळरानावर शिक्षणाचे नंदनवन फुलवले व हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य निर्माण केले ते डॉ.बी.पी. रोंगे सर, इतर पशुवैद्यकीय अधिकारी आणि नूतन अभियंते आदी सर्व विद्वान मंडळींसमोर माझ्यासारख्या अज्ञान व्यक्तीचे बोलणे कदाचित सुयोग्य नसेल पण मला एक गोष्ट जाणवते ती म्हणजे आजकाल माणसांतील संवेदनशीलता कमी झाली आहे, खूप लोक भ्रमिष्ट झाले आहेत. माणसापेक्षा जनावरे ही अधिक संवेदनशील असतात, हे डॉ.विश्वासराव मोरे यांच्या जनजागृती अभियानाच्या माध्यमातून दिसून येते. माणसाच्या शारीरिक रचनेचा अभ्यास नसलेले डॉ. मोरे हे वाचा नसलेल्या जनावरांची संवेदनशीलता ओळखु शकतात. खरोखरच डॉ. मोरे हे एक मानवतेचे भागीदार आहेत.’ असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार व दैनिक पंढरी संचारचे संस्थापक संपादक बाळासाहेब बडवे यांनी केले.

       पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन, जेष्ठ पशुवैद्यक प्रतिष्ठान, पंढरपूर व स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वेरीतील ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स हॉल’मध्ये आयोजिलेल्या ‘लम्पी जनजागरण अभियाना’ च्या समारोप प्रसंगी आयोजिलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून जेष्ठ पत्रकार व दैनिक पंढरी संचारचे संस्थापक संपादक बाळासाहेब बडवे हे उपस्थितांना मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून स्वेरीचे युवा विश्वस्त प्रा. सुरज रोंगे हे लाभले होते. प्रास्ताविकामध्ये प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विश्वासराव मोरे यांनी ‘लम्पी आजाराबाबत पशुपालकांची भिती दूर करून व त्या संदर्भात शास्त्रोक्त माहिती देवून आजारावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने विद्यार्थी व पशुपालकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी जवळपास १६ हजार विद्यार्थी, २० हून अधिक शाळा-महाविद्यालये व पशुपालकांमध्ये आवश्यक जनजागृती अभियान राबविले आहे.’ अशी माहिती देवून लम्पी आजार दूर होण्याच्या दृष्टीने जनजागृती केली. संस्था प्रतिनिधी बाळासाहेब काळे म्हणाले की, ‘स्वेरीमध्ये संस्कारित मोहरे तयार होतात. त्यापैकीच शिक्षणातील एक हिरा असलेले प्रा. सुरज रोंगे यांच्या विचारातून आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो या जाणीवेतून या लम्पी जागृती अभियानाला गती आली.’ प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना स्वेरीचे युवा विश्वस्त प्रा. सुरज रोंगे म्हणाले की, ‘ग्रामीण भाग हा देशाचा कणा आहे आणि पशु हे शेतकरी वर्गाचा कणा आहेत आणि त्यात गाय, बैल अशी जनावरे आहेत. सुरवातीला आफ्रिकेतील जनावरांमध्ये असलेला हा लंम्पी आजार बऱ्याच वर्षानंतर भारतात आला आहे. त्यापूर्वी कोरोनाच्या माध्यमातून जगावर संकट कोसळले होते. त्यात लोकांना खूप त्रास झाला, अनेकांना प्राण गमवावे लागले. ज्येष्ठ मंडळी बळी पडले. म्हणून जनावरांमध्ये हा लम्पी आजार पसरू नये म्हणून आत्ताच काळजी घेणे आवश्यक आहे. या आजाराबाबत पंढरपूरच्या ज्येष्ठ पशुवैद्यकीय प्रतिष्ठानने अप्रतिम रित्या जनजागृती केली असून लम्पी हा रोग कमी करण्यासाठी त्यांनी केलेले जनजागृती अभियान लाख मोलाचे आहे. मानवी जीवन सुंदर अधिक सुंदर करण्यासाठी हाती घेतलेले हे ‘मिशन’ आहे. आपण आपल्या प्रमाणेच पशूंची देखील काळजी घ्यावी. भारतातूनच नव्हे तर जगातून हा लम्पी आजार दूर व्हावा.’ यासाठी प्रा. सूरज रोंगे यांनी पांडुरंगाला साकडे घातले तसेच लम्पी आजार दूर होण्यासाठी सुरु असलेल्या अभियानात स्वेरीला सामावून घेतल्याबद्दल त्यांनी आभार मानले. यावेळी तालुक्यातील लम्पी आजार दूर होण्यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या शिक्षक, समाजसेवक, पत्रकार, अधिकारी यांना ‘लम्पी योद्धा’ म्हणून श्री विठ्ठलाची प्रतिमा, स्मृतिचिन्ह, शाल,श्रीफळ देवून सन्मानित करण्यात आले. या जनजागृती कार्यक्रमास तालुक्यातील शाळा, महाविद्यालयांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग, महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. सत्यवान भिंगारे, डॉ.राहुल कलढोणे, डॉ.विजय कोळेकर, डॉ. राजा यादव, डॉ. ब्रम्हानंद कदम, कर्मयोगी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.जगदीश मुडेगावकर, स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता प्रा. करण पाटील, इतर प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, यांच्यासह इतर पशूपालक, अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथमेश बनसोडे यांनी केले तर पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रियांका जाधव यांनी आभार मानले.


चौकट- यावेळी पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन आणि जेष्ठ पशुवैद्यक प्रतिष्ठान, पंढरपूर यांनी सुरु केलेल्या ‘लम्पी आजार जनजागृती अभियाना’वरील डाक्युमेंटरी मधून विविध ठिकाणी राबविलेल्या लक्षवेधी उपक्रमाची माहिती देण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad