पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील उर्वरित मंडळाना मिळणार पीकविमा - आ. आवताडे

 पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील उर्वरित मंडळाना मिळणार पीकविमा - आ. आवताडे 



प्रतिनिधी -


यंदाच्या खरीप हंगामातील पावसाने दडी मारल्यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये उद्भवलेल्या दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर खरीप पिकांच्या झालेल्या नुकसानापोटी प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना मतदारसंघातील उर्वरित मंडळाच्या शेतकऱ्यांना आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांतून पिकविमा मिळणार असल्याने मतदार संघातील सर्व मंडळे या योजनेमध्ये समाविष्ट होण्यासाठी खूप मोठा फायदा झाला आहे. 


सोलापूर जिल्ह्यात जुलै -ऑगस्ट या महिन्यांमध्ये पावसात खंड पडल्याने शेतकऱ्यावर नापीक व दुष्काळ असे दुहेरी संकट उभा राहिले आहे. निसर्ग निर्मित या संकटामुळे समस्यांच्या खाईत लोटलेल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामातील ज्वारी, सोयाबीन, तूर, भुईमूग मका,कांदा,बाजरी, या शेती उत्पादनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे सदर पिकांवरती प्रधानमंत्री पिक विमा योजना २०२३ या योजने अंतर्गत विमा मिळण्यासाठी आमदार आवताडे यांनी शासन दरबारी वेळोवेळी पत्र व्यवहार करून पाठपुरावा केला होता. त्यांच्या या मागणीची शासन दरबारी दखल घेऊन या पिक विमा योजनेचा पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना लाभ होणार असल्याचे दिसून येत आहे.


पावसातील खंड आणि दुष्काळी परिस्थिती या संकटांमुळे शेतकऱ्यांच्या चालू वर्षाच्या उत्पादनामध्ये गेल्या सात वर्षांच्या उत्पादनाच्या तुलनेत ५० टक्के घट होण्याची चिन्हे दिसत आहेत. खरीप हंगामात पावसाने मोठा खंड दिल्याने या हंगामातील पिकांची परिस्थिती अतिशय बिकट झाली असून शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन दिलासा देणे आवश्यक आहे. या संवेदनशील विचाराने आमदार आवताडे राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, ना.अजितदादा पवार यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा सुरू ठेवला होता, तसेच राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्येही शेतकऱ्यांना पीक विमा लवकरात लवकर मिळण्यासाठी त्यांनी आग्रही मागणी लावून धरल्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री ना. विखे- पाटील यांच्या मध्यस्थीने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या मागणीची लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते. 


त्या अनुषंगाने आ आवताडे यांचा पाठपुरावा व शेतकऱ्यांप्रती असलेल्या मागणीचा विचार होऊन लवकरच या पीक विमा योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना आर्थिक रूपामध्ये शेतकऱ्यांना आधार देण्याचे कार्य शासन पातळीवरून हाती घेण्यात येणार आहे. तसेच येत्या ३ ते ४ दिवसांमध्ये सदर पीक विमा योजनेतील समाविष्ट गावातील पिकांचे सर्वेक्षण करुन अहवाल सादर करण्याचे आदेशीत झाल्यामुळे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना पिक विमा मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad