स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी घेतला ‘चांद्रयान-३’ च्या थेट प्रक्षेपणाचा आनंद


स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी घेतला ‘चांद्रयान-३’ च्या थेट प्रक्षेपणाचा आनंद



पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूर संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मधील सर्व विभागाच्या विद्यार्थ्यांनी चांद्रयान ३ च्या थेट प्रक्षेपणाचा आनंद घेतला. चांद्रयान-३ ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग केल्यानंतर संपूर्ण भारतभर आनंद साजरा होत असताना स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी देखील स्वेरी कॅम्पसमध्ये जल्लोष केला.  

        संपूर्ण विश्वाचे लक्ष लागून राहिलेल्या ‘चांद्रयान-३ या भारतीय अंतरीक्ष यानाचे इस्त्रो कडून थेट प्रक्षेपण करण्यात येणार होते. सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पदवी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स हॉलमध्ये तर फार्मसीच्या पदवी व पदविका तसेच अभियांत्रिकी पदविका महाविद्यालयात देखील विद्यार्थ्यांसाठी थेट प्रक्षेपणाची जय्यत तयारी केली होती. इस्त्रोच्या नियोजित वेळेत म्हणजे सायंकाळी ६ वाजून चार मिनिटांनी चांद्रयान-३ ने चंद्रावर पाऊल ठेवले. त्याच क्षणी स्वेरी कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून जल्लोष साजरा करत इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आणि ते या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार झाले. स्वेरीतील सर्व विद्यार्थी एलसीडी प्रोजेक्टरच्या माध्यमातून यानाचे चंद्रावर होत असलेले लँडिंग एकाग्रपणे पहात होते. मोठ्या आकाराच्या एलसीडी प्रोजेक्टर मुळे सर्व विद्यार्थ्यांना या थेट प्रक्षेपणाचा आनंद घेता आला. यासाठी स्वेरी कॅम्पसचे इन्चार्ज प्रा. डॉ. एम. एम. पवार, बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ.मिथुन मनियार, डिप्लोमा इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतीश मांडवे, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. महेश मठपती, सर्व अधिष्ठाता, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक आणि विद्यार्थी यात सहभागी झाले होते. यावेळी स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी ‘इस्त्रोच्या शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, संशोधक यांचे कौतुक करत ही ऐतिहासिक बाब तमाम भारतीयांना अभिमान वाटणारी अशी आहे.’ अशी प्रतिक्रिया दिली. या भारतीय यानाचे यशस्वी लँडिंग झाल्यानंतर स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या 'भारत माता की जय' आणि 'जय हिंद' या घोषणांनी संपुर्ण कॅम्पस दुमदुमून गेला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad