आषाढी वारीत वारकऱ्यांची तहान भागवत आहेत स्वेरीचे विद्यार्थी
दररोज आठ ते दहा हजार लिटर आर.ओ. फिल्टर्ड पाण्याचे वाटप
पंढरपूरः दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री विठ्ठलाच्या भेटीसाठी आतूर झालेल्या व दर्शन रांगेत उभ्या असलेल्या वारकऱ्यांची तहान स्वेरीचे विद्यार्थी भागवीत आहेत. या पाणी वाटपाच्या उपक्रमात श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित असलेल्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (डिग्री), कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (डिप्लोमा), डी.फार्मसी व बी.फार्मसी या चारही महाविद्यालयातील अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थी असे मिळून जवळपास २४० जण सहभागी झाले आहेत.
स्वेरी कडून आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरात येणाऱ्या हजारो वारकऱ्यांची तहान भागविण्याचे काम सुरुवातीपासूनच केले जाते. राज्यात तंत्रशिक्षणातून विशेष ओळख निर्माण करणाऱ्या स्वेरी या संस्थेमार्फत स्थापनेपासून अर्थात १९९८ पासून विविध समाजोपोगी उपक्रम हाती घेण्यात आलेले आहेत. पंढरपूर मधील वाढती गर्दी पाहता यंदा वारीत वारकऱ्यांची गर्दी अधिक होण्याची चिन्हे दिसत आहेत. यंदाही दर्शन रांगेतील वारकऱ्यांना पिण्याचे थंड पाणी वाटपाचे कार्य काल पासून सुरु झाले आहे. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या व्हाईस चेअरमन व स्वेरीच्या विश्वस्त सौ. प्रेमलता रोंगे यांच्या हस्ते व जलतज्ञ अनिल पाटील व उपनिरीक्षक अरुण वाळुंज यांच्या उपस्थितीत रिद्धी सिद्धी गणपती मंदिरालगत असणाऱ्या मंडप रांगेतील वारकऱ्यांना आर.ओ. युक्त पाणी देवून या पाणी वाटपाच्या उपक्रमाचे उदघाटन करण्यात आले. वाढती गर्दी पाहता पाणी वाटपाचे हे कार्य स्वेरीने हाती घेतले असून सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत पत्रा शेड, रिध्दी-सिध्दी मंदिर या ठिकाणी विद्यार्थी वारकऱ्यांना प्रचंड उत्साहाने आर.ओ. फिल्टर्ड पाण्याचे वाटप करत आहेत. नवमी, दशमी व एकादशी या तीनही दिवशी विद्यार्थी ग्लास, वॉटर जग आणि वॉटर टॅंकद्वारे पाणी वारकऱ्यांपर्यंत पोहचवत असतात. दररोज साधारण आठ ते दहा हजार लिटर पाण्याचे वाटप केले जात आहे. स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम. एम. पवार यांच्या सहकार्याने, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. महेश मठपती व राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. धनंजय चौधरी, बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. मिथुन मणियार व फार्मसीच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. हेमंत बनसोडे, डिप्लोमा इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.एन.डी. मिसाळ, डी.फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतिश मांडवे तसेच चारही कॉलेजचे प्राध्यापक वर्ग, कमवा व शिका योजनेतील विद्यार्थी वारकऱ्यांना पाणी वाटपाचे कार्य मनोभावे करत आहेत. कॉलेजमधून इतर सहकारी पाणी आणून दर्शन रांगे जवळ असलेल्या टाक्यात साठवतात व त्यानंतर विद्यार्थी मोठ्या उत्साहाने वारकऱ्यांना पाणी वाटप करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
प्रत्येक दिवशी २० प्राध्यापक व १०० विद्यार्थी असे मिळून दोन शिफ्टमध्ये जवळपास २४० जण पाणी वाटप करत आहेत. यावेळी कॅम्पस इन्चार्ज डॉ.एम.एम.पवार म्हणाले की, ‘दर्शन रांगेत जास्त वारकरी असले तरी द्वादशीला देखील पाणी वाटप कार्यक्रम राबविणार आहोत.’ एकूणच स्वेरीच्या या पाणी वाटपाच्या कार्यामुळे प्रशासनावरील भार थोड्या प्रमाणात का होईना हलका होत आहे, हे मात्र नक्की. स्वेरीच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून वारकरीही समाधान व्यक्त करत आहेत.