स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये ‘शिवराज्याभिषेक दिन’ उत्साहात साजरा
पंढरपूर- स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसी, पंढरपूरमध्ये ३५० वा ‘शिवराज्याभिषेक दिन’ नुकताच साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणाऱ्या ऐतिहासिक वातावरणाची निर्मिती केली होती.
या कार्यक्रमामध्ये फार्मसीच्या सर्व विद्यार्थ्यांनी व प्रामुख्याने राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. या कार्यक्रमात प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, ऐतिहासिक शस्त्र, गड, मावळे इ. चे तैलचित्र प्रदर्शन, पथनाट्य, सुरेल शिवगीतांचा कार्यक्रम, विद्यार्थ्यांचे व प्राचार्यांचे मनोगत अशा अनेक बाबींचा समावेश होता. स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली फार्मसीचे प्राचार्य डॉ.मिथुन मणियार यांच्या नेतृत्वाखाली ‘शिवराज्याभिषेक दिन’ साजरा करण्यात आला. प्राचार्य डॉ.मिथुन मणियार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करत घोषणा दिल्या. त्यानंतर ऐतिहासिक गड, शस्त्रे, मावळे व त्यांची माहिती देणारे भव्य प्रदर्शन आयोजित केले होते. सर्व विद्यार्थी व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला. त्यानंतर तृतीय व चतुर्थ वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थिनीनी ‘गडांचे महत्व आणि संवर्धन’ या विषयावर पथनाट्य सादर केले. तसेच या पथनाट्याच्या कार्यक्रमानंतर सुरेल शिवगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी उपस्थित गायक व इतर वाद्य वृंद व पाहुण्यांचे स्वागत प्राचार्य डॉ.मणियार यांनी केले. सुरेल गीतांच्या कार्यक्रमानंतर तेजस पाटील या विद्यार्थ्यांने ऐतिहासिक मनोगत झाले. प्राचार्य डॉ.मिथुन मणियार यांनी मोलाचे मार्गदर्शन करताना म्हणाले की, ‘महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा आदर्श आपण सर्वांनी आपल्या जीवनात घेतला पाहिजे. शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या माणसांना सोबत घेवून स्वराज्य स्थापन केले.’ यावेळी वंदे मातरम् या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमासाठी प्रा. डॉ. मिथुन मणियार, सांस्कृतिक विभागप्रमुख रितेश व्यवहारे व प्रा.वैभव गायकवाड, इतर प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सिध्येश्वर रोंगे यांनी केले तर सांस्कृतिक कार्यक्रम विभागप्रमुख प्रा.वैभव गायकवाड यांनी आभार मानले. शिवराज्याभिषेक दिना’ निमित्त महाविद्यालय भगवेमय झाले होते तर ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ या जय घोषाने आसमंत दणाणत होता. एकूणच फार्मसी विभागातील शिवराज्याभिषेक दिन लक्षवेधी झाला.