स्वेरीच्या विद्यार्थ्यांची मातोश्री वृद्धाश्रमाला भेट
पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या दिशादर्शक मार्गदर्शनाखाली विविध शैक्षणिक उपक्रमांबरोबरच अनेक विधायक व सामाजिक उपक्रम देखील राबवले जातात. अशा उपक्रमांचा एक भाग म्हणून स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या 'मेसा' (मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडन्टस असोसिएशन) मधील विद्यार्थ्यांनी गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रमाला भेट देवून तेथील वृद्ध नागरिकांना मिष्टान्न देवून सामाजिक कार्य केले. त्याबद्दल या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील मातोश्री वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक धनंजय राक्षे यांनी सर्वांचे स्वागत करून मातोश्री वृद्धाश्रमाची वाटचाल सांगितली व वृद्धाश्रमासाठी येणाऱ्या मदतीच्या ओघाबाबत सविस्तर माहिती दिली. सुरुवातीला 'मेसा' चे समन्वयक प्रा.संजय मोरे यांनी मातोश्री वृद्धाश्रमामध्ये येण्याचे प्रयोजन सांगितले. विभागप्रमुख डॉ.एस.एस. वांगीकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्यासाठी प्रेरित केले. संशोधन अधिष्ठाता डॉ.आर.आर.गिड्डे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उदघाटन झाले. या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांनी स्वेच्छेने जमा केलेल्या रकमेतून वृद्धांसाठी लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू जसे गहू, तांदूळ, शेंगदाणे, साखर व तेल आदीचे वाटप करण्यात आले. यावेळी काही विद्यार्थ्यांनी वृद्धांजवळ जाऊन आपुलकीने विचारपूस करून आपल्या भावना व्यक्त केल्या. वृद्ध नागरिक श्रीकांत देशपांडे व सुनंदा छत्रे यांनी 'स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी आपुलकीने दिलेली भेट महत्वाची असून त्यामुळे कांही आनंदाचे क्षण अनुभवता आले' असे सांगून वृद्धाश्रमातील नियमितच्या कामकाजाची व घेत असलेल्या आदरपूर्वक काळजीची सविस्तर माहिती ऐकविली व प्रत्येकांनी आपल्या कुटुंबातील, नात्यातील व सहवासातील वृद्धांची काळजी घेण्याचे त्यांनी आवाहन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वेरीचे विद्यार्थी कुणाल यादव, गणेश बागल, श्रेयस बुटे, जीवराज इंगळे, बालाजी शेंबडे, आकाश झालटे, रोहन क्षीरसागर, प्रकाश तिकटे यांच्यासह 'मेसा'तील जवळपास ५० विद्यार्थ्यांचे योगदान लाभले. यावेळी प्रा.सी.सी.जाधव, प्रा.सचिन काळे, प्रा.एस. वाय. साळुंखे, प्रा.एस.एम.वसेकर व इतर शिक्षक उपस्थित होते. साधारण तीन तासांच्या या सहवासात सर्व विद्यार्थी हे आपल्या आजी- आजोबांच्या सहवासातच आहोत, या भूमिकेत वावरताना दिसून आले. आरती चौगुले आणि साक्षी काळे या विद्यार्थिनींनी सूत्रसंचालन केले व विद्यार्थी प्रतिनिधी अंकिता हिंगमिरे यांनी वृद्धाश्रमातील सर्वांचे आभार मानले.