*वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या पाळीव प्राण्यांची नुकसान भरपाई शासन मान्यतेप्रमाणे द्या.*
*भाजयुमो जिल्हा सचिव तनय देशकर व युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांची वन अधिकाऱ्यांना मागणी.*
*==============================================================*
ब्रह्मपुरी :
ब्रह्मपुरी तालुक्यात वाघाचा हैदोस वाढला असून वाघा च्या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात पाळीव जनावर ठार होत आहेत. वनमंत्री मा.ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्या पशूंच्या नुकसान भरपाईत वाढ करण्यात आली. त्या अनुषंगाने 23 ऑगस्ट 2022 रोजी झालेल्या शासन निर्णयाप्रमाणे जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्या बैल, गाय, म्हशीची नुकसान भरपाई म्हणून 70 हजार रुपये किंवा पशूच्या बाजारभावाच्या 75 टक्के यात कमी असलेली रक्कम भरपाई म्हणून देण्यात येणार अशी तरतूद आहे. परंतु ब्रह्मपुरी तालुक्यातील भुज, आवळगाव, हळदा, वांद्रा व या इतर परिसरात वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या पाळीव प्राण्यांची नुकसान भरपाई योग्य ती मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
बाजारभावाच्या जवळपास 30 ते 35 टक्के कमी रक्कम शेतकऱ्यांना मिळते आहे. याबाबत माहिती घेऊन भारतीय जनता युवा मोर्चा चंद्रपूर जिल्ह्याचे सचिव तनय देशकर व युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी आज ब्रह्मपुरी येथे उपवनसंरक्षक मल्होत्रा साहेब यांची भेट घेऊन मृत जनावरांची नुकसान भरपाई शासन मान्यते प्रमाणे देण्यात यावी अशी मागणी केली. यावेळी मागील काही प्रकरणांमध्ये शेतकऱ्यांना कमी मदत मिळाली असल्यामुळे त्यांचा अहवाल नव्याने तयार करण्याची विनंती यावेळी पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आली.
यावेळी उपवनसंरक्षक दीपेश मल्होत्रा साहेब यांनी अधिकाऱ्यांना बोलावून पंचनामा योग्य पध्दतीने करून शासन मान्यतेप्रमाणे रक्कम
देण्यात यावी अशी सूचना केली. या प्रसंगी युवा मोर्चाचे अविनाश मस्के, भाजपाचे वन विभाग संपर्क प्रमुख पंकज माकोडे, युवा नेते ज्ञानेश्वर दिवठे उपस्थित होते.