स्वेरीकडून ‘जागतिक पर्यावरण दिन’ साजरा! 'रासेयो' च्या विद्यार्थ्यांनी केली यमाई तलावाची स्वच्छता


स्वेरीकडून ‘जागतिक पर्यावरण दिन’ साजरा!



'रासेयो' च्या विद्यार्थ्यांनी केली यमाई तलावाची स्वच्छता



पंढरपूर- शनिवार, दि.०५ जून, २०२२ हा ‘जागतिक पर्यावरण दिन’ जगभर साजरा केला जात असताना परंपरेनुसार गोपाळपूर (ता.पंढरपूर) मधील स्वेरीनेही हा दिवस स्वच्छता करून साजरा केला. पंढरपुरचे आकर्षण असलेल्या यमाई तलावाचा परिसर स्वच्छ करून स्वेरीने यावेळचा 'जागतिक पर्यावरण दिन' आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला. 

         स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग व फार्मसी, पंढरपूर, सोशल लॅब, पुणे आणि पंढरपूर नगरपरिषद, पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूर शहरातील यमाई तलावाची या निमित्ताने स्वच्छता करण्यात आली. सततच्या बदलत जाणार्‍या वातावरणातील बदलाचा परिणाम मानवी जीवनावर होत असतो त्यामुळे आज पर्यावरणाचे संरक्षण करणे हे सर्वात महत्त्वाचे कार्य आहे. दैनंदिन जीवनामध्ये वापरत असलेल्या अनेक गोष्टी आपण इतरत्र फेकून देत असतो त्यामुळे मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो. हा कचरा व्यवस्थित विलगीकरण न करता टाकल्यामुळे वातावरणामध्ये दुर्गंधी पसरते व मानवी जीवनावर त्याचा विपरित परिणाम होतो, हे आपण पाहतो. त्यासाठी नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी व नैसर्गिक साधनांच्या योग्य वापराबाबत जागरूकता असणे गरजेचे आहे. त्याचाच एक भाग म्हणून शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक क्षेत्रामध्ये देखील स्वेरी अंतर्गत असलेली महाविद्यालये कार्यरत असतात. सोशल लॅब पुणे, पंढरपूर नगरपरिषद, पंढरपूर या मधील अधिकारी, कर्मचारी, स्वेरी संचलित अभियांत्रिकी व फार्मसीचे प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी व विद्यार्थिनी अशा मिळून साधारण २०० जणांनी शनिवारी, दि.०४ जून २०२२ रोजी यमाई तलावाच्या स्वच्छता मोहीमेत सहभाग घेतला. यामध्ये तलाव आणि आजूबाजूच्या परिसरातील केर-कचरा, कागद, प्लास्टिक, परिसरात पडलेल्या निरूपयोगी वस्तू 



असा जवळपास दोन टन कचरा ट्रॅक्टर मध्ये भरून एकत्र गोळा करण्यात आला व योग्य ठिकाणी त्याचा निचरा करण्यात आला. यावेळी सहभागी विद्यार्थ्यांनी पर्यावरणाच्या संरक्षणासाठी परिसरातील घरोघरी जाऊन स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्याचे स्तुत्य काम केले. स्वच्छतेनंतर यमाई तलाव परिसरात सर्वांनी पर्यावरण संरक्षणाची शपथ घेतली. संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रीन टीमचे सल्लागार डॉ.प्रशांत पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्व विद्यार्थी व संस्थेतील कर्मचारी यांना झाडे लावण्यासाठी आवाहन करण्यात आले. त्याला प्रतिसाद देत असताना विद्यार्थी व प्राध्यापकांच्या वतीने विविध परिसरामध्ये जांभूळ, वड, पिंपळ, तुळस, चिंच, कण्हेर अशा विविध प्रकारची जवळपास २५० देशी झाडे, फुलझाडे लावण्यात आली. यावेळी स्वेरी अभियांत्रिकीच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.महेश मठपती व डॉ.सुभाष जाधव, फार्मसी रासेयोचे कार्यक्रम अधिकारी प्रा. वैभव गायकवाड, ग्रीन टीमचे समन्वयक प्रा.कुलदीप पुकाळे, सोशल लॅब, पुणेच्या कोमल जाधव, नगरपरिषदेचे कर्मचारी वर्ग व स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी यासाठी परिश्रम घेतले. परिसर स्वच्छतेमुळे यमाई तलाव परिसर लख्ख झाल्याचे दिसून येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad