स्वेरीच्या बोईसर मधील आकृती केंद्रास भाभा अणुसंशोधन केंद्राचे संचालक डॉ. अजितकुमार मोहंथी यांची सदिच्छा भेट



स्वेरीच्या बोईसर मधील आकृती केंद्रास 

भाभा अणुसंशोधन केंद्राचे संचालक डॉ. अजितकुमार मोहंथी यांची सदिच्छा भेट




पंढरपूर- स्वेरीच्या बोईसर मधील आकृती केंद्रास मुंबईच्या भाभा अणुसंशोधन केंद्राचे संचालक डॉ. अजितकुमार मोहंथी यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली आणि स्वेरीच्या माध्यमातून विशेषतः ग्रामीण भागातील महिला व नागरिकांसाठी होत असलेल्या संशोधनातील प्रगती बद्धल समाधान व्यक्त केले.  

          स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी पी रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १ जुलै २०२१ पासून बोईसर मध्ये स्वेरीचे आकृती केंद्र कार्यरत झाले आहे. बीएआरसी व तारापूर अणुऊर्जा प्रकल्प यांच्या सामाजिक जबाबदारी अंतर्गत गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट तथा ‘स्वेरी’ या अनुभवी शैक्षणिक संस्थेला हे आकृती केंद्र चालवण्यासाठी दिले आहे. प्रारंभी आकृती केंद्राचे समन्वयक डॉ. रणजितसिंह पवार यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. डॉ. अजितकुमार मोहंथी यांनी आकृती केंद्रात सुरू असलेल्या तंत्रज्ञानाचा व विविध प्रकल्पांचा आढावा घेतला. तंत्रज्ञानाचा उपयोग करून ग्रामीण भागातील लोकांना स्वयंरोजगार कसा उपलब्ध करून देता येईल? याची सविस्तर माहिती डॉ. मोहंथी यांनी जाणून घेतली. आकृती केंद्राला भेट दिलेल्या व स्वतःचा उद्योग सुरू करण्यास उत्सुक असणाऱ्या महिला व शेतकरी यांनी मोठ्या संख्यने उपस्थित राहून 

डॉ. मोहंथी व तारापूर अणुऊर्जा केंद्राच्या इतर उपस्थित अधिकाऱ्यांशी संवाद साधून अडचणी मांडल्या. बीएआरसी च्या अधिकाऱ्यांनी गावकरी व शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेवून त्यांच्या प्रश्नांची योग्य ती उत्तरे दिली. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी व उद्योग-व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन देखील यावेळी दिले. यावेळी आकृती केंद्राचे उपकेंद्र हे ‘कृती’ या नावाने उभारण्यात येणार असल्याची माहिती डॉ. मोहंथी यांनी दिली. आकृती केंद्राच्या आवारात डॉ. मोहंथी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी तंत्रज्ञानाचा सखोल आढावा घेत सौर वाळवण यंत्र, त्यात वाळवण्यात आलेल्या पालेभाज्या, फळांवर करण्यात आलेल्या विविध प्रक्रिया, वाळवण्यात आलेल्या विविध प्रकारच्या माश्यांची, त्यापासून बनवलेली पावडर व त्याचा उपयोग, स्वंयपाकघरातील टाकाऊ कचऱ्यापासून व शेतजमिनीतील गवत व झाडांच्या पालापाचोळ्यापासून जलद गतीने सेंद्रिय खत कसे तयार करावे व त्याचे होणारे फायदे आदी संशोधन प्रकल्पांची सविस्तर माहिती त्यांनी जाणून घेतली. ग्रामीण भागातील नागरीकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या पाणी शुद्धीकरण यंत्र व इसीजी उपकरणाचा आढावा घेतला. उपस्थित मान्यवरांना व महिलांना तंत्रज्ञानाचा उपयोग करून प्रात्यक्षिक देण्यात आले. डॉ. मोहंथी यांनी आपल्या मनोगतातून आकृती केंद्राचे भरभरून कौतुक केले तसेच या तंत्रज्ञानांचा वापर करून ग्रामीण भागातील लोक प्रेरित होतील व स्वयं:रोजगारीत होण्यासाठी प्रयत्न करतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांच्यासमवेत एनआरबी बीएआरसी चे सीईओ डॉ. के. रवी, बीएआरसीच्या आकृती प्रमुख श्रीमती स्मिता मुळे, बीएआरसी जीएसओ चे संचालक एस. के. प्रधान, न्युक्लीअर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, तारापूरचे स्थल संचालक विनीतकुमार शर्मा, टीएपीएस १ व २ चे स्टेशन डायरेक्टर मनोज जोशी, फायनान्स व अकाउंटचे प्रमुख उमा बल्लावा मोहपात्रा, टीएपीएस ३ व ४ चे स्टेशन डायरेक्टर एस. के. गोपीदास, तारापूर महाराष्ट्र स्थल सीएसआरचे चेअरमन केदार भावे, मानव संसाधन विभागाचे व्यवस्थापक हेमंत पात्रा, एसओई मार्टिन मिरांडा, एसए/ई सुचेंद्र घाग आदी उपस्थित होते. आकृती केंद्राचे समन्वयक डॉ. रणजितसिंह पवार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून सर्व उपस्थितांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad