वर्क फ्रॉम व्हिलेज' च्या माध्यमातून ग्रामीण भारताचे आर्थिक सबलीकरण शक्य -पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर


'वर्क फ्रॉम व्हिलेज' च्या माध्यमातून ग्रामीण भारताचे आर्थिक सबलीकरण शक्य

                                                                                                       -पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर

स्वेरीत ‘अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर - स्वेरी’चे थाटात उदघाटन



पंढरपूर – ‘संकल्पनेपासून ते शेवटच्या ग्राहकापर्यंत एखादी गोष्ट पोहोचवण्याचा प्रवास म्हणजेच इनोव्हेशन होय. औद्योगिक युगात 'शहराकडे चला' अशी मानसिकता निर्माण झाली होती, मात्र आजच्या ज्ञानयुगात ‘डिजिटल तंत्रज्ञाना’मुळे 'वर्क फ्रॉम होम' प्रमाणेच 'वर्क फ्रॉम व्हिलेज' ही संकल्पना प्रत्यक्षात साकारता येणे शक्य आहे. ग्रामीण भागातील तरुणांना शहराप्रमाणे साधने उपलब्ध करून दिल्यास देशाची आर्थिक विषमता कमी होऊन खऱ्या अर्थाने प्रगती साधता येणे शक्य आहे. इनोव्हेशन पुढे नेण्यासाठी पूरक वातावरण निर्मिती करणे आवश्यक असून शहरापेक्षा ग्रामीण भागात इनोव्हेशन इकोसिस्टम निर्माण करणे अवघड आहे. पण, हे करणे महत्वाचे आहे. यामुळे एसीआयसीच्या माध्यमातून ग्रामीण भागाचे शिक्षणाद्वारे सबलीकरण होईल.’ असे प्रतिपादन विख्यात अणुशास्त्रज्ञ तथा भारतीय अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी केले. 

        गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरी तथा श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये आयोजिलेल्या ‘अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर-स्वेरी (एसीआयसी - स्वेरी)’ या केंद्राच्या उदघाटन प्रसंगी पद्मविभूषण डॉ. काकोडकर हे उपस्थितांना मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे हे होते. महाराष्ट्र गीत, स्वेरी गीत व दीपप्रज्वलनानंतर प्रास्तविकात स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस), पंढरपूरचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांनी सर्वांचे स्वागत करून स्वेरीने ग्रामीण भागात इनोव्हेशन इकोसिस्टम तयार करण्यासाठी घेतलेला पुढाकार, नीती आयोगाचे सहकार्य, संशोधन विभागाची गरुड झेप आदी बाबत सविस्तर माहिती दिली. एसीआयसी चे सल्लागार व सोबस इन्साईट फोरमचे संस्थापक दिग्विजय चौधरी म्हणाले की, ‘चांगले उद्योजक निर्माण करण्यासाठी चांगले मार्गदर्शन करणे आवश्यक असते. यासाठी मार्केटिंग व उत्पादनात वाढ या संबंधित बाबींचे या केंद्रातून मार्गदर्शन होईल.’ असे सांगितले. एसीआयसी - स्वेरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष भुतडा यांनी ‘एसीआयसी - स्वेरी या केंद्राचे मुख्य उद्देश, उद्योजक, शेतकरी व्यावसायिक यांना मालाच्या उत्पादनापासून बाजारपेठेपर्यंतच्या बाबी सविस्तरपणे सांगितल्या. व्हील्स ग्लोबल फौंडेशन, इंडीयाचे महेश वैद्य यांनी ‘इनोव्हेशन व प्रोडक्ट डेव्हलपमेंट’ याविषयी माहिती दिली. सल्लागार रेशा पटेल म्हणाल्या की, ‘कोणतेही कार्य एकत्रितरीत्या केल्यास यश झपाट्याने मिळते यासाठी महिलांनी पुढाकार घेवून कार्य करणे आवश्यक आहे.’ उदघाटक पद्मविभूषण डॉ. काकोडकर पुढे म्हणाले की, ‘इनोव्हेशनची सुरुवात ही तळागाळातील माणसांच्या गरजांमधून होते. भारताची मोठी लोकसंख्या असून ग्रामीण भागातील तरुणाई हीच आपली सर्वात मोठी जमेची बाजू आहे. युवकांच्या माध्यमातून नवनवीन संकल्पना प्रत्यक्षात साकार करता येतील. यातून केवळ शहरांचे उदात्तीकरण करण्यापेक्षा ग्रामीण भागातच उत्पादनाची साधने विकसित करणे ही काळाची गरज आहे. स्वेरीत शिक्षण घेतलेला विद्यार्थी पुढे मोठमोठ्या औद्योगिक शहरात जातो आणि तेथील उद्योग-व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करतो. त्यापेक्षा पंढरपूर मध्ये औद्योगिक वसाहत निर्माण झाल्यास याच विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पंढरपूर सारख्या ग्रामीण भागाचा विकास झपाट्याने होईल. ज्या ठिकाणी आर्थिक विषमता कमी होते तेथील विकास झपाट्याने होतो. एकूणच स्वेरीतील एसीआयसी केंद्र भविष्यात अनुकरणीय मॉडेल बनेल.’ असा विश्वास डॉ. काकोडकर यांनी व्यक्त केला. अध्यक्ष स्थानावरून बोलताना आमदार समाधान आवताडे म्हणाले की, ‘देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संशोधन क्षेत्रात विशेष निधी उपलब्ध करून दिला असून या माध्यमातून संशोधन झाले पाहिजे यासाठी नाविन्यपूर्ण विचार पुढे येण्याची गरज आहे. कमी वेळेत उत्कृष्ठ दर्जाचे उत्पादन झाल्यास निश्चितपणे स्वप्नातील भारत अवतरणार आहे. भारताच्या जडणघडणीत शास्त्रज्ञ डॉ.काकोडकर यांचा मोलाचा वाटा आहे. जर देशाची पाच ट्रीलीयन डॉलर इकॉनॉमी करायची असेल तर नवनवीन तंत्रज्ञान, प्रयोगांची निर्मिती, संशोधन झाले पाहिजे. संशोधन केंद्र, बचत गट, याद्वारे उद्योजक तयार व्हावेत. एकूणच एसीआयसी - स्वेरी या केंद्राच्या माध्यमातून झालेल्या संशोधनातून एका नालंदा विद्यापीठाच्या प्रतिकृती निर्मिती करणे ही आहे. या केंद्रामुळे ग्रामीण भागातील तरुणांमध्ये असलेल्या कल्पकतेला मोठी चालना मिळणार आहे. हे मात्र नक्की ! म्हणून तुम्ही केंद्राच्या माध्यमातून कार्य करत रहा, आवश्यक असेल त्या ठिकाणी आम्ही प्रशासनाच्या माध्यमातून पाठपुरावा करू.’ असे सांगून आमदार आवताडे यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण भाषण दिले. यावेळी सौ. सुयशा काकोडकर, डॉ. जान्हवी गांगल, तन्मय मुखर्जी, अनघा पाठक, महेश पाठक, शरद भोसले, स्वप्नील कांबळे, आर्ट ऑफ लिव्हिंगचे डॉ. माधव पोळ, कामगार आयुक्त दत्ता पवार, पांडुरंग साखर कारखान्याचे संचालक दिलीप गुरव, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वंदना बीडकर, अनिता पवार, विलास मस्के, आर्किटेक्ट यादगिरी कोंडा, शेतकरी, महिला बचत गटातील महिला वर्ग, प्रशासकीय व सामाजिक क्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी, स्वेरीचे अध्यक्ष अशोक भोसले, उपाध्यक्ष सुरेश राऊत, सचिव डॉ. सुरज रोंगे, माजी अध्यक्ष व विश्वस्त प्रा. सी. बी. नाडगौडा, धनंजय सालविठ्ठल, विश्वस्त एन. एम. पाटील, विश्वस्त एच. एम.बागल,विश्वस्त बी.डी.रोंगे, स्वेरी अंतर्गत असलेल्या पाचही महाविद्यालयांचे प्राचार्य, उपप्राचार्या, अधिष्ठाता, विभागप्रमुख, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या केंद्रासाठी डॉ. हर्षवर्धन रोंगे हे समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. सूत्रसंचालन डॉ. नीता तळवलकर यांनी केले तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार यांनी आभार मानले. 


चौकट-१. यापूर्वी स्वेरीने रुरल डेव्हलपमेंट केंद्र, वायफाय यंत्रणा आणि लगतच्या पाच शाळांना तंत्रज्ञानाने जोडून जी इकोसिस्टम उभी केली आहे, ती खरोखर खूप कौतुकास्पद असून संशोधन क्षेत्रात हा एक इतिहास होता. स्वेरी नावातील आर (रिसर्च) हेच सर्व सांगून जातो. स्वेरीत बोलण्यापेक्षा कामातून अधिक कार्य जाणवते. त्यामुळे या ठिकाणी अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर या केंद्राची स्थापना करण्यात आली. एकूणच ज्या प्रॉब्लेमच्या आधारे प्रश्न सुटतील तेच खरे संशोधन.  

                                                                                                                          -डॉ. अनिल काकोडकर, अणुशास्त्रज्ञ, भारत.


चौकट-२. नीती आयोग व व्हील्स ग्लोबल फाउंडेशन यांच्या सहकार्याने सुरु झालेल्या या ‘अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर - स्वेरी’च्या उदघाटनाला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. तरीही याचे स्वेरी कॅम्पस इन्चार्ज डॉ.एम.एम.पवार यांचे नेतृत्वाखाली स्वेरीमध्ये उत्तम पद्धतीने नियोजन केले होते. त्यामुळे जिल्ह्यातून आलेल्या शेतकरी, पालक वर्ग यांचे भोजनापासून ते प्रस्थानापर्यंतच्या सर्व गोष्टी व्यवस्थित पार पडल्यामुळे सर्वजण समाधानाने परतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad