*पंढरपूर सिंहगड महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी*
पंढरपूर - येथील एस.के.एन. सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याबाबतची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी तसेच डॉ. संपत देशमुख यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यानंतर उपस्थित मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी बोलताना मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांना त्यांच्या विचारांचे महत्त्व पटवून दिले. डॉ. आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री होते. त्यांनी समाजातील वंचित, शोषित आणि मागासलेल्या घटकांच्या उन्नतीसाठी संपूर्ण आयुष्य अर्पण केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन त्यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथून उच्च शिक्षण प्राप्त केले, हे त्यांच्या जिद्दीचे उत्तम उदाहरण आहे.
महाड चवदार तळे सत्याग्रह, नाशिकचा काळाराम मंदिर प्रवेश आंदोलन यांसारख्या ऐतिहासिक चळवळींद्वारे त्यांनी सामाजिक समतेचा लढा उभारला. स्त्री-पुरुष समानता, कामगारांचे हक्क, तसेच शिक्षणाचा प्रसार यासाठीही त्यांनी मोठे योगदान दिले. भारतीय राज्यघटनेत समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांची पायाभरणी करून त्यांनी देशाला एक मजबूत लोकशाही दिली.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनीही बाबासाहेबांच्या विचारांवर भाषणे देत त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कॅम्पस सुपरवायझर श्री. अविनाश वाघमारे, सुनिल ढोपे, शशीकांत माळी, प्रभाकर शिंदे, सिक्युरिटी विभाग सुनिल बुरुंगुले, अंकुश इंगोले, सिध्देश्वर वाघमारे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
समारोपाच्या वेळी “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा बाबासाहेबांचा संदेश सर्वांनी पुन्हा एकदा स्मरणात ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. अशा या महान मानवाला विनम्र अभिवादन करत कार्यक्रमाची सांगता झाली.

