*एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या यश चव्हाणची ऑल इंडिया बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड - महाविद्यालयाचा अभिमान!*
एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, पंढरपूर येथील द्वितीय वर्ष यांत्रिकी अभियांत्रिकी विभागाचा कु. यश सतीश चव्हाण याने आपल्या अफाट मेहनत, जिद्द आणि कौशल्याच्या जोरावर ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2025 हरियाणा येथे होणा-या बॉक्सिंग स्पर्धेसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर मार्फत अंतिम निवड मिळवली आहे.
दिनांक 4 ऑक्टोबर 2025 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर, अंतर्गत बाबुराव पाटील कला व विज्ञान महाविद्यालय, अनगर येथे पार पडलेल्या आंतरमहाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धेत, यशने 54 किलो वजन गटात सलग दुसऱ्या वर्षी सुवर्णपदक पटकावून आपली विजयी परंपरा कायम राखली आहे.
या उल्लेखनीय यशासाठी प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, तसेच यांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी यांनी यशचे मन:पूर्वक अभिनंदन केले आहे. त्याच्या यशामागे प्रशिक्षक माधव शेरेकर व क्रीडा संचालक प्रा. अनिल जाधव यांचे प्रभावी मार्गदर्शन लाभले.
महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी यशवर अभिनंदनाचा वर्षाव करत त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

