स्वेरीत सिव्हिल इंजिनिअरिंगच्या ‘सेसा’चे उदघाटन व मॉडेल प्रदर्शन संपन्न


स्वेरीत सिव्हिल इंजिनिअरिंगच्या ‘सेसा’चे उदघाटन व मॉडेल प्रदर्शन संपन्न 



पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) च्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाच्या वतीने ‘सेसा’ अर्थात ‘सिव्हिल इंजिनिअरिंग स्टुडंट्स असोसिएशन’ चे उदघाटन दि. १४ सप्टेंबर २०२५ रोजी करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांकडून सिव्हिल इंजिनिअरिंग संबंधित बनवण्यात आलेल्या विविध संशोधनात्मक व नाविन्यपूर्ण मॉडेल्सचे प्रदर्शन देखील भरविण्यात आले होते. या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांची कल्पकता व समज अधिक प्रगल्भ असल्याचे दिसून आले. 

      प्रारंभी विद्यार्थिनी साक्षी घाडगे यांनी 'सेसा' संबंधित सर्व उपक्रमांची संपूर्ण माहिती दिली. ‘सेसा’ च्या उदघाटन प्रसंगी मुख्य अतिथी म्हणून नगररचना विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी के. आर. जोशी यांनी विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञानासोबतच सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी बहुमोल मार्गदर्शन केले. उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांनी विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक, तांत्रिक व सहशैक्षणिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवण्यासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात सेसाचे विद्यार्थी पदाधिकारी अध्यक्ष पी. पी. पाटील व उपाध्यक्ष ओंकार काकडे यांनी कार्यभार स्वीकारला. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी भविष्यात विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार व्यक्त केला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध मॉडेल्सच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये स्मार्ट ट्राफिक मॅनेजमेंट, स्मार्ट ब्रीज, स्मार्ट सिटी, विविध प्रकारच्या धरण प्रतिकृती आदी सिव्हील संबंधित मॉडेल्स अधिक लक्ष वेधून घेत होते. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नाविन्यपूर्ण मॉडेल्सना विद्यार्थी, प्राध्यापकवर्ग व उपस्थित मान्यवरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम. एम. पवार यांच्या सहकार्याने व उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, विभागप्रमुख डॉ. पी. आर. बामणे यांच्या नेतृत्वाखाली प्राध्यापकांच्या सहकार्याने हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. एम. व्ही. डोंगरे यांनी काम पाहिले. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार, यांच्यासह प्राध्यापक वर्ग, विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. विद्यार्थिनी साक्षी घाडगे व खुशी शर्मा यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad