*सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, पंढरपूरच्या विद्युत अभियांत्रिकी विभागात पाच दिवसीय व्हॅल्यू एडिशन प्रोग्राम ऑन आर. डी. यू. नो व आय . ओ. टी कार्यशाळा उत्साहात संपन्न*
पंढरपूर, दि. २० सप्टेंबर २०२५:
एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी-पंढरपूर येथील विद्युत अभियांत्रिकी विभागात तृतीय वर्ष बी.टेक. विद्यार्थ्यांसाठी दिनांक १६ ते २० सप्टेंबर २०२५ या कालावधीत पाच दिवसीय व्हॅल्यू एडिशन प्रोग्राम ऑन आर.डी.यू.नो व आय.ओ.टी. ही कार्यशाळा उत्साहात पार पडली. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, विभागप्रमुख व I.E.E.E. ब्रँच काउन्सलर डॉ. के. शिवशंकर यांची विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमासाठी प्रशिक्षक म्हणून श्री. संदीप झगडे व श्री. शुभम दोशी यांनी विद्यार्थ्यांना तांत्रिक मार्गदर्शन केले. या उपक्रमाचे समन्वयक म्हणून श्री. डी. एम. कोरके, श्री. पी. बी. व्यवहारे, श्री. ए. एन. गोडसे व श्री. एम. आर. खडतरे यांनी कौशल्यपूर्ण समन्वयाचे कार्य पार पाडले.
कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना आर.डी.यू.नो (Arduino) व आय.ओ.टी.(IoT) या अत्याधुनिक तंत्रज्ञानांची सखोल माहिती, प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांचा अनुभव आणि प्रकल्पाधारित कौशल्ये आत्मसात करून देणे हा होता.
Arduino हे एक ओपन-सोर्स इलेक्ट्रॉनिक प्रोटोटायपिंग प्लॅटफॉर्म असून, सूक्ष्म नियंत्रक (microcontroller) आधारित हार्डवेअर व सॉफ्टवेअरच्या साहाय्याने विविध स्वयंचलित प्रणाली तयार करण्यासाठी याचा वापर केला जातो. हे सहज वापरता येण्याजोगे असून विद्यार्थी, संशोधक व स्टार्टअप्समध्ये अतिशय लोकप्रिय आहे.
IoT (Internet of Things) हे तंत्रज्ञान वेगाने विकसित होत असून, याद्वारे विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणे इंटरनेटच्या माध्यमातून परस्परांशी संवाद साधतात. घरगुती उपकरणे, औद्योगिक यंत्रणा, स्मार्ट सिटी प्रकल्प आणि वैद्यकीय उपकरणांमध्ये IoT तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे.
या कार्यशाळेद्वारे विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रोजेक्ट तयार करून Arduino व IoT चा वापर करून विविध स्मार्ट सोल्युशन्स विकसित केली. विद्यार्थ्यांमध्ये या क्षेत्रातील आत्मविश्वास निर्माण झाला असून, भविष्यातील उद्योगसिद्धता व रोजगारक्षमतेत यामुळे नक्कीच वाढ होईल, असा विश्वास प्राचार्य डॉ. करांडे यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये विद्युत विभागातील सर्व शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. विभागात अशा उपयुक्त व गुणवत्तापूर्ण कार्यक्रमांद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पुढील काळातही उपक्रम राबवले जाणार असल्याचे विभागप्रमुख डॉ. के. शिवशंकर यांनी सांगितले.

