पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या कडून माढा व करमाळा तालुक्यातील पूरग्रस्त गावांना
भेटी देऊन पाहणी
*जिल्ह्यात ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्याने सरसकट पंचनामे करण्याचे आदेश
- पालकमंत्री जयकुमार गोरे
*पालकमंत्री गोरे यांनी अनेक पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधून धीर दिला व शासन पूर्णपणे पाठीशी असल्याची ग्वाही दिली
सोलापूर, दिनांक 23:- जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पाऊस व अतिवृष्टी तसेच भीमा व सीना नदीला आलेला महापुरामुळे अनेक गावे पाण्यात जाऊन शेती पिकांचे घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेली आहे. जिल्ह्यात ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्याने प्रशासनाने नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याबाबत आदेश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिलेले आहेत.
आज पालकमंत्री गोरे यांनी माढा तालुक्यातील दारफळ सीना, मुंगशी, वडशिंगे, पापनस, म्हैसगाव, निमगाव तसेच करमाळा तालुक्यातील निलज व संगोबा ची वाडी या गावांना भेटी देऊन अतिवृष्टीने तसेच पुराच्या पाण्याने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्याप्रमाणेच येथील नागरिकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला व शासनाकडून लवकरात लवकर मदत देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्री श्री. गोरे यांनी नुकसानी बरोबरच प्रशासनाकडून पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांच्या बचाव कार्याचाही आढावा घेऊन अधिक गतीने बचाव कार्य करून नागरिकांना सुरक्षित स्थळी सुखरूप पोहोचवावे असे निर्देश त्यांनी दिले. तसेच पुरात मुळे स्थलांतरित करण्यात आलेल्या नागरिकांना प्रशासनाकडून योग्य प्रकारच्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत असेही त्यांनी सर्व संबंधित यंत्रणांना सूचित केले.
यावेळी आमदार अभिजीत पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्या सह माढा व करमाळा तालुक्यातील तालुकास्तरीय यंत्रणा प्रमुख उपस्थित होते. ***

