*एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर आणि अल्ट्राटेक सिमेंट कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने अभियंता दिन साजरा*
पंढरपूर (प्रतिनिधी)
भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी १५ सप्टेंबर रोजी ‘अभियंता दिन साजरा केला जातो. यानिमित्त दिनांक १६ सप्टेंबर २०२५ रोजी एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर आणि अल्ट्राटेक सिमेंट कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने नवोन्मेषी बांधकाम साहित्य आणि प्रगत काँक्रिट हरित व शाश्वत पंढरपूरच्या दिशेने एक पाऊल या विषयावर प्रेरणादायी तांत्रिक सत्राचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
कार्यक्रमाची सुरुवात स्वागत व दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर मान्यवरांनी अभियंता दिनाचे औचित्य साधून, आधुनिक व हरित तंत्रज्ञान, उन्नत काँक्रिट, शाश्वत बांधकाम साहित्य आणि सध्याच्या बांधकामातील नव्या प्रवाहांबाबत मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, स्थापत्य अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. श्रीगणेश कदम, डॉ. यशवंत पवार (डीन) तसेच अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे तज्ञ अभियंते श्री. राजेश कांबळे, श्री. राकेश पाटील, श्री. सुहास वसेकर, श्री. सारंग कोळी, श्री.आशिष शहा आदि मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
या तांत्रिक सत्रात विद्यार्थ्यांना व शिक्षकांना वास्तविक बांधकामातील आव्हाने व त्यावरील तांत्रिक उपाययोजना यांची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी या सत्रात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, शाश्वत विकास साधण्यासाठी नव्या पिढीतील अभियंत्यांनी संशोधन व नाविन्यपूर्ण कल्पना प्रत्यक्षात आणल्या पाहिजेत. आधुनिक काँक्रिट व हरित तंत्रज्ञान ही काळाची गरज असून, यामुळे भविष्यातील शहरे स्मार्ट आणि पर्यावरणपूरक होऊ शकतात .
विभागप्रमुख डॉ. श्रीगणेश कदम यांनी या सत्राची रूपरेषा मांडताना विद्यार्थ्यांना नवीन बांधकाम तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. यशवंत पवार यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या शंकांचे निरसन केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता आभारप्रदर्शनाने झाली.

