स्वेरीतील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना निरोप

 

स्वेरीतील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागाच्या

अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना निरोप



पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) च्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग (इ. अँड टी.सी.) या विभागाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयातून निरोप (फेअरवेल) देण्याचा कार्यक्रम अत्यंत भावनिक वातावरणात पार पडला. निरोप समारंभाचा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण ठरला. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर कुठे आसू तर कुठे हसू दिसून येत होते. 

          स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ ऑफ इंजिनिअरींग (ऑटोनॉमस) चे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम.पवार यांच्या सहकार्याने व उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार व विभागप्रमुख डॉ. सुमंत आनंद यांच्या नेतृत्वाखाली इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरूवातीला विद्यार्थ्यांनी विविध खेळ, आठवणी, मनोगत, हिंदी- मराठी भावगीतं आणि मिमिक्रीच्या सादरीकरणामुळे वातावरण आनंदमय बनवले होते. स्वेरीमध्ये चार वर्षे शिक्षण घेतल्यानंतर परतताना विद्यार्थी भावनिक झाले होते. त्यामुळे प्राध्यापकांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करताना आलेले अनुभव, संघर्ष, आठवणी, शिक्षण आणि या सर्वांमधून मिळालेला स्नेहभाव सांगताना काही विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले होते तर काहींनी शिक्षण घेत असताना केलेली तारेवरची कसरत सांगताना आणि त्यातून मिळविलेल्या यशाचा गोडवा सांगताना वातावरण चांगलेच भावनिक बनवले. एकूणच या निरोपाच्या कार्यक्रमातून शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील नाते किती घट्ट असते हेच जणू दिसत होते. यावेळी संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह देवून गौरविण्यात आले. याप्रसंगी अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता डॉ. करण पाटील यांनी विद्यार्थ्यांना भावनिक आणि प्रेरणादायी मार्गदर्शन करताना म्हणाले की, ‘आयुष्यात आपण कितीही मोठे यश मिळवले, तरी आपल्या आई-वडिलांच्या कष्टांची आठवण ठेवावी. त्यांचा संघर्षच आपल्याला या यशाच्या टप्प्यावर आणत असतो. आपल्या यशामागे आई वडिलांचे परिश्रम आहेत याची जाणीव ठेवावी.’ यावेळी विद्यार्थ्यांसाठी नाष्ट्याची सोय केली होती. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या आठवणींच्या कप्प्यात महाविद्यालयातील इमारतीच्या विविध भागातील, कॅम्पसमध्ये मधील फोटो सेल्फी काढत होते. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक प्रेरणादायी, आनंददायी आणि हृदयस्पर्शी पर्व ठरला हे मात्र नक्की. यावेळी विभागातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा.स्मिता गावडे यांनी काम पाहिले. निरोप समारंभ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.एस. एस. जाधव यांनी केले तर प्रा. आर. बी. पवार यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad