स्वेरीमध्ये केल्या जाणार्‍या योगातील सातत्य हे कौतुकास्पद -योग गुरु साध्वी तत्वमयीजी स्वेरीमध्ये अकरावा ‘जागतिक योग दिन’ उत्साहात साजरा


स्वेरीमध्ये केल्या जाणार्‍या योगातील सातत्य हे कौतुकास्पद

-योग गुरु साध्वी तत्वमयीजी 


स्वेरीमध्ये अकरावा ‘जागतिक योग दिन’ उत्साहात साजरा



पंढरपूर- ‘मी आणि आम्ही’ यातील प्रवास म्हणजे सामुहिक योगाभ्यास होय. योगाची व्याप्ती आता जगभर पसरली आहे. आरोग्यासाठी योग हाच सर्वोत्तम आहे याबाबत आता जनजागृती झाली आहे. स्वेरीत तर नियमित योगा चालतो. जिथे योगा होतो तो हिमालय आणि स्वेरी ही हिमालयापेक्षा वेगळी नाही. हिमालयातून गंगा वाहते तर स्वेरीतून ज्ञानगंगा ! स्वेरी ने योगा करण्यात सातत्य राखले आहे आणि हे सातत्य कौतुकास्पद आहे.’ असे प्रतिपादन योग गुरु साध्वी तत्वमयीजी यांनी केले.

           गोपाळपूर (ता. पंढरपूर) मधील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूटच्या भव्य क्रीडांगणावर स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस), स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पदविका), स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसी (पदवी), स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसी (पदविका)च्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून अकरावा ‘जागतिक योग दिन’ साजरा करण्यात आला. याप्रसंगी योग गुरु साध्वी तत्वमयीजी ह्या मुख्य मार्गदर्शन करत होत्या. सुरवातीला करकंब मधील आदर्श महाविद्यालयातील विद्यार्थिनी अमृता सरगुले यांनी योगाची विविध प्रात्यक्षिके करून दाखवून सर्वांची मने जिंकली. शरीराची कमालीची लवचिकता आणि सहजता यांच्या माध्यमातून अमृताने अनेक योग प्रकार करून दाखवले. स्वेरीचे संस्थापक-सचिव व स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी प्रभावित होवून आणि इतरांना योगा करण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या अमृता सरगुले यांना रोख पाच हजार रुपये देवून गौरव केला. स्वेरीचे युवा विश्वस्त प्रा. सुरज रोंगे म्हणाले कि, ‘ योगा केल्यामुळे आपण सर्वजण प्रचंड उत्साही झालो आहोत. स्थापने (१९९८) पासून डॉ. बी.पी. रोंगे सरांनी योगाचे महत्व ओळखून आपल्या विद्यार्थ्यांना नियमित योग करण्याची संधी निर्माण करून दिली. योगामुळे अंतर्मन सुंदर बनते म्हणून जीवनात योग व प्राणायम करणे हे खुप महत्वाचे आहे. योग केल्याने नकारात्मक विचारसरणी दूर होवून मनुष्याचा विचार सकारात्मक बनतो व आरोग्य उत्तम राहते. यासाठी प्राणायम दररोज केला पाहिजे.’ स्वेरीचे संस्थापक-सचिव व स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी देखील प्राणायमचे महत्व पटवून दिले. यावेळी सहभागी विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून विविध प्रकारची योगासने करवून घेण्यात आली. या अकराव्या ‘जागतिक योग दिन’ कार्यक्रमात स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम. पवार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ, बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. एम.जी. मणियार,  डी.फार्मसीचे प्राचार्य प्रा. एस.व्ही. मांडवे, अभियांत्रिकी पदवीच्या उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. एम.एस. मठपती, राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व समन्वयक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. यशपाल खेडकर यांनी सुत्रसंचालन करून आभार मानले. 


चौकट- यावेळी विशाखापट्टणम (आंध्रप्रदेश) मध्ये झालेल्या विक्रमी योग कार्यक्रमाचे प्रक्षेपण स्वेरीच्या प्रांगणात मोठ्या एलसीडी च्या माध्यमातून दाखविण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे योगाचे महत्व पटवून देणार्‍या मार्गदर्शनाचा लाभ सर्व पाहुणे, स्वेरीतील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी घेतला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad