चंद्रभागेसह मतदार संघाच्या समस्यांकडे आ. समाधान आवताडे यांनी वेधले लक्ष
अधिवेशन संपल्यानंतर मंत्री पंकजा मुंढे देणार चंद्रभागेला भेट; आ. आवताडे यांना सभागृहात दिले आश्वासन
पंढरपूर /प्रतिनिधी
राज्यात विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे.
यामध्ये पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी चंद्रभागा नदी मधील दूषित पाण्याबाबत तसेच पंढरपूर व मंगळवेढा शहरातील विविध समस्यांकडे सभागृहाचे लक्ष वेधून घेत भूमिगत गटारीसाठी तसेच आषाढी,कार्तिकी यात्रेसाठी येणारा शासनाचा निधी लवकरात लवकर देऊन पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करून घेण्याची मागणी केली.
जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा अशी ख्याती असलेल्या पंढरपूरला आपण दक्षिण काशी म्हणून संबोधतो मात्र दूषित पाण्यामुळे येणाऱ्या लाखो भाविकांचा आणि सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
चंद्रभागेवरून पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला आणि सोलापूर शहराला पाणीपुरवठा केला जातो मात्र दूषित पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. चंद्रभागा नदीमध्ये केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड नुसार प्रदूषित नद्यांची वर्गवारी केली जाते यामध्ये अति प्रदूषित म्हणून चंद्रभागेच्या समावेश आहे.
या प्रदूषणाबाबत सरकार काय भूमिका घेणार? नमामी चंद्रभागेवर कार्य आवहाल कधी अमलात आणला जाणार? याबाबत आमदार समाधान आवताडे यांनी प्रश्न विचारले.
याचबरोबर त्यांनी पंढरपूर आणि मंगळवेढा शहरात पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे अनेक घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी गेल्यानंतर अनेक नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होत असल्याने भूमिगत गटारी बनवण्याचे मागणी केली. तसेच पंढरपुरात आषाढी, कार्तिकीसाठी पाणीपुरवठा व रस्त्यासाठी शासनाकडून निधी दिला जातो हा निधी लवकरात लवकर देऊन भाविकांना त्रास होऊ नये यासाठी पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करावीत अशी मागणी केली .
या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की अधिवेशन संपल्यानंतर पंढरपूरला जाऊन जलसंपदा, पाणीपुरवठा, नगर विकास या संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सोबत घेऊन चंद्रभागेला भेट देणार असून नमामी चंद्रभागेचा आढावा घेऊन ऑडिट करणार असल्याचे आश्वासन दिले. पंढरपूरच्या सर्व प्रश्नांकडे शासन सकारात्मक दृष्टिकोन ठेवून बघत असल्याचे दिसून आले.
चौकट-
चंद्रभागा नदीतील दूषित पाण्याबाबत तसेच पंढरपूर व मंगळवेढा येथील भूमिगत गटारीसाठी निधी तसेच आषाढी कार्तिकी वारीसाठी दिला जाणारा शासकीय निधी लवकरात लवकर देऊन पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करावीत या प्रश्नांकडे आमदार समाधान आवताडे यांनी सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. या सर्व प्रश्नांकडे शासन सकारात्मक भूमिका घेत असून मंत्री पंकजा मुंडे अधिवेशन संपल्यानंतर पंढरपुरात येऊन चंद्रभागा नदीला भेट देणारा असून नमामी चंद्रभागेचा आढावा घेणार आहेत.