दि.१३ व १४ डिसेंबर रोजी स्वेरीत ‘टेक्नो-सोसायटल २०२४’ चे आयोजन
या आंतरराष्ट्रीय परिषदेला उपस्थित राहणार देश-परदेशातील संशोधक
पंढरपूर- ‘राज्यात तंत्रशिक्षण क्षेत्रात नवनवीन संकल्पना आणि व्यावसायिक शिक्षणातील स्वतंत्र ‘पंढरपूर पॅटर्न’ अमलात आणत असताना शुक्रवार, दि.१३ व शनिवार, दि.१४ डिसेंबर २०२४ या दोन दिवशी गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमध्ये पाचवी आंतरराष्ट्रीय परिषद ‘टेक्नो-सोसायटल २०२४’ चे आयोजन करण्यात आले आहे. स्कूल ऑफ लाईफ सायन्सेस, पु. अ. हो. सोलापूर विद्यापीठ सोलापूर व स्वेरी, पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पीएम- उषा या योजनेअंतर्गत या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या पाचव्या ‘टेक्नो-सोसायटल २०२४’ परिषदेसाठी सिंगापूर मधील एनयुएसचे डॉ.प्रल्हाद वडक्केपात व मलेशियातील हेल्फ विद्यापीठातील प्रा.डॉ. आर. लोगेश्वरन हे प्रमुख उदघाटक म्हणून लाभलेले आहेत तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरचे कुलगुरू डॉ.प्रकाश महानवर हे अध्यक्षपद भूषविणार आहेत.
‘टेक्नो-सोसायटल- २०२४’ या परिषदेमध्ये पाणी, ऊर्जा, वाहतूक, गृहनिर्माण आणि स्वच्छता यासाठी प्रगत तंत्रज्ञान जैव आणि सामाजिक अनुप्रयोगांसाठी मेकाट्रॉनिक्स, मायक्रो-नॅनो संबंधित, रासायनिक आणि भौतिक प्रक्रिया, व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ग्रामीण आणि कृषी आधारित तंत्रज्ञान, उपयोज्य पर्यावरण किंवा आरोग्य काळजी संबंधित तंत्रज्ञान, शाश्वत तंत्रज्ञानासाठी समग्र दृष्टीकोन, आयसीटी आधारित सामाजिक तंत्रज्ञान आणि लॅब-स्तरीय प्रगत सामाजिक तंत्रज्ञान सेन्सर, प्रतिमा आणि डेटा-चलित सामाजिक तंत्रज्ञान, ग्रामीण आणि कृषी रोजगार निर्मितीसाठी तंत्रज्ञान, सामाजिक अनुप्रयोगांसाठी उत्पादन आणि फॅब्रिकेशन प्रक्रिया, न्यूट्रास्युटिकल्स आणि पारंपारिक औषधे, हेल्थ केअरमधील कृत्रिम बुद्धिमत्ता, प्रणाली, नवीन औषध वितरण प्रणाली, जीवशास्त्र आणि लस विकास आणि बायोसेन्सर, अक्षय ऊर्जा स्रोत, वाणिज्य आणि व्यवस्थापनातील अलीकडील ट्रेंड आणि आयुर्वेद तसेच संशोधनावर प्रकाश टाकणार आहेत. या परिषदेत ‘कि नोट स्पीकर’ म्हणून कन्नूर (केरळ) मधील विनोय विष्णू वडक्केपात, गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराडचे प्राचार्य डॉ. विनायक कुलकर्णी, आयआयटी बॉम्बेचे डॉ. परमेश्वर उदमले, गुरुनानक देव कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, बिदर (कर्नाटक) चे प्रा. वीरेंद्र डाकुलगी, कृषी विद्यापीठ, अहिल्यानगरचे माजी प्राचार्य डॉ. डी. एस. गोरंटीवार, आयआयटी जोधपुरच्या डॉ. साक्षी धानेकर, आयआयटी बॉम्बेचे नरेंद्र शहा, पू.अ.हो. सोलापूर विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा तर ऑनलाईन माध्यमातून यूएस मधील डॉ.विशाल धमगाये, अमेरिकेमधून जॉर्ज मेशन विद्यापीठाच्या डॉ. सपना गंभीर, ताश्कंद इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी, उझबेकिस्थानचे डॉ. बोथीर उस्मोनोव्ह, देला सॅली विद्यापीठ फिलिपिन्सचे लॉव सायमन चाटीमबंग, दुबई मधून अमेटी विद्यापीठातील डॉ.व्यंकट रेड्डी पोलुरू, आयआयटी जम्मु चे डॉ. विजयकुमार पाल, मलेशियातील जालन विद्यापिठाचे डॉ. यीप किम हु, आयआयटी भुवनेश्वरचे डॉ. गौरव बरतार्या यांच्यासह स्वेरीचे डॉ. प्रशांत पवार, सहसमन्वयक डॉ. व्ही. बी. पाटील, प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे, तज्ञ संशोधक व अभ्यासक सहभागी होणार आहेत. ‘टेक्नो- सोसायटल’ या आंतरराष्ट्रीय परिषदेचा फायदा समाजाच्या उद्धारासाठी करायचा यासाठी ‘टेक्नो- सोसायटल’ या परिषदेची खरी सुरुवात झाली. यंदा होणाऱ्या परिषदेसाठी जवळपास ४६० प्राध्यापक व संशोधकांनी नोंदणी केली असून जवळपास १०५० प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत. यापूर्वी सन २०१६, २०१८, २०२० व २०२२ या चार वर्षी 'टेक्नो-सोसायटल' या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून स्वेरीमध्ये समाजाशी निगडित असलेल्या समस्या सोडवण्यासाठी आणि ग्रामीण भागातील तंत्रज्ञानाला चालना मिळण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील परिसंवाद आयोजित केले होते. ‘टेक्नो- सोसायटल २०१६’, ‘टेक्नो-सोसायटल २०१८’ नंतर तिसरी आंतराष्ट्रीय परिषद ‘टेक्नो-सोसायटल २०२०’ ही जागतिक कोरोना महामारीमुळे ऑनलाईन पद्धतीने झाली तर चौथी ‘टेक्नो-सोसायटल २०२२’ ऑफलाईन प्रकारे पार पडली. यातील संशोधनपर लेख स्प्रींजर या आंतरराष्ट्रीय प्रकाशनाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आले आहेत. टेक्नो- सोसायटल २०२४’ ही आंतरराष्ट्रीय परिषद स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार यांच्या नेतृत्वाखाली होत असून परिषदेचे समन्वयक म्हणून संशोधन अधिष्ठाता डॉ.अमरजित केने हे काम पहात आहेत. मागील चारही परिषदेच्या तुलनेत यंदाच्या परिषदेला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. या परिषदेच्या यशस्वीतेसाठी स्वेरी परिवारातील सर्व सदस्य परिश्रम घेत आहेत.
चौकट-
या लक्षवेधी आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी सर्व समित्या स्वतंत्रपणे स्थापन झाल्या असून प्रत्येक समिती आपली जबाबदारी पार पडत आहेत. बाहेरून आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतापासून समारोप पर्यंतच्या प्रत्येक बाबीवर बारीक लक्ष असणार आहे. यासाठी काहीही कमी पडणार नाही याची काळजी सर्व सामित्यामधील सदस्य घेत आहेत. मागील चारही परिषदेप्रमाणे ही ‘टेक्नो-सोसायटल २०२४’ आंतरराष्ट्रीय परिषद देखील यशस्वी होईल.
-डॉ.बी.पी. रोंगे, प्राचार्य स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, गोपाळपूर, पंढरपूर