प्रत्येक कार्यात एकाग्रता आवश्यक
-टॉप गिअरचे संचालक श्रीकांत पवार
स्वेरीमध्ये ‘अभियंता दिन’ साजरा व ‘ऑलम्पस २ के २४’ चे उदघाटन
पंढरपूरः ‘इंजिनिअर्सनी आपले शिक्षण हे पुस्तकी ज्ञानासोबतच प्रात्यक्षिकावर अधिक भर देवून पूर्ण केले पाहिजे. त्यासाठी मनाची एकाग्रता आवश्यक आहे. अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याबरोबरच दैनंदिन जीवनात सुलभता मिळविणे गरजेचे असते. विकासाच्या दृष्टीकोनातून अभियांत्रिकी मधील प्रत्येक शाखा ही महत्वाची असते. सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांनी प्रचंड परिश्रम घेत अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या कार्यात खूप एकाग्रता होती. त्यांनी अभियांत्रिकीच्या क्षेत्रात अतिशय महत्त्वपूर्ण योगदान दिले.’ असे प्रतिपादन साताऱ्यातील ‘टॉप गिअर ट्रान्समिशन’चे संचालक श्रीकांत पवार यांनी केले.
गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या १६३ व्या जयंती निमित्त ‘अभियंता दिन’ आणि ‘ऑलम्पस २ के २४’ या तांत्रिक स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ‘टॉप गिअर ट्रान्समिशन, सातारा’चे संचालक श्रीकांत पवार हे मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे हे होते. सर विश्वेश्वरय्या यांची प्रतिमा पूजन, महाराष्ट्र गीत व स्वेरी गीतानंतर संस्थेचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे हे सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविकात म्हणाले की, ‘अभियांत्रिकी विभाग हे सर्व क्षेत्राशी संबंधित असून सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जीवनातून प्रेरणा घ्यायची असेल तर स्वतः आपण अभ्यास करून प्रश्न विचारून उत्तरे मिळविली पाहिजेत.’ असे सांगून ‘का, कसे, कुठे, कोण, काय, कशासाठी’ या सर्व प्रश्नार्थक ‘क’ कारांचे स्पष्टीकरण दिले. ‘ऑलम्पस २ के २४’ च्या विद्यार्थिनी अध्यक्षा सोनाली करवीर यांनी ‘ऑलम्पस २ के २४’ या तांत्रिक स्पर्धेचे स्वरूप, स्पर्धेतील प्रकार, बक्षिसे, यासाठी बाहेरून आलेले स्पर्धक याबाबत सविस्तर माहिती दिली. उद्योजिका सौ.श्रद्धा पवार म्हणाल्या की, ‘माणसाला जे यश मिळते ते दिसून येते पण त्यामागे अफाट परिश्रम असतात हे मात्र दिसून येत नाही तसेच उद्योजिका म्हणून वावरताना पती संचालक श्रीकांत पवार सरांचे परिश्रम जवळून पाहता आले. उगीच यश मिळत नसते. जगाच्या बाजारात फार हुशार माणसे असतात ते जाणून परिश्रम केले पाहिजेत. स्त्री ही अनेक भूमिकेत वावरत असताना विविध गोष्टी सांभाळत असते.’ असे सांगून उद्योजिका म्हणून कार्य करताना आलेला अनुभव सांगितला. अध्यक्षीय भाषणातून आमदार समाधान आवताडे म्हणाले की, ‘आपण जे काम करतो ते आनंदाने, जिद्दीने, प्रामाणिक, एकनिष्ठेने आणि सातत्यपूर्ण केले पाहिजे. इंजिनिअर्सच्या योगदानाशिवाय यश आणि सामाजिक विकास अशक्य आहे. शारीरिक, मानसिक स्वास्थ्य राखत कार्यात झोकून देवून कार्य केले पाहिजे. संघर्ष आणि परिश्रम यामुळे जपान, अमेरिका, चीन हे देश प्रगतीपथावर आहेत. कामात एकाग्रता असेल, देशभक्ती असेल तर यश मिळविणे अवघड नाही. यासाठी प्रथम कामात आवड निर्माण करा, आनंदाने कार्य करा. जे काम आपण आनंदाने करतो ते काम दीर्घकाळ स्मरणात राहते.’ असे सांगून ‘इंजिनिअर आणि सक्सेस’ यावर अभ्यासपूर्ण माहिती दिली. ‘ऑलम्पस २ के २४’च्या निमित्ताने जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयांमधील विद्यार्थी स्वेरी कॅम्पसमध्ये विविध प्रकल्पांच्या सादरीकरणाची तयारी करत होते. या निमित्ताने स्वेरीच्या सर्व विभागात अत्याधुनिक प्रकल्प, मशीन्स, ब्रीज, बांधकामाचे नमुने यांच्या प्रतिकृती तयार करण्यात आल्या होत्या. हे प्रदर्शन पाहण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी, स्पर्धकांनी प्रचंड गर्दी केली होती. पाहुण्यांनी देखील विविध प्रकल्पांना भेट देवून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक केले. यावेळी गोपाळपूरचे माजी उपसरपंच विक्रम आसबे, द्रोणाचार्य हाके, महेश चव्हाण, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, माजी अध्यक्ष व विश्वस्त एन.एस.कागदे, माजी अध्यक्ष व विश्वस्त धनंजय सालविठ्ठल, माजी अध्यक्ष व विश्वस्त विजय शेलार, विश्वस्त एच.एम.बागल, विश्वस्त बी.डी. रोंगे, युवा विश्वस्त प्रा.सुरज रोंगे, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम. एम. पवार, डिप्लोमा इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ, बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ.मिथुन मणियार, डी.फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतिश मांडवे, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. महेश मठपती, सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. रंगनाथ हरीदास, ‘ऑलम्पस २ के २४’ चे समन्वयक प्रा. डी.टी.काशीद, सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. नेहा घोरपडे, ज्ञानेश्वरी जगदाळे व प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ.यशपाल खेडकर यांनी सूत्रसंचालन केले तर ऑलंपसच्या सह सचिवा स्नेहा पिसे यांनी आभार मानले.
चौकट-
‘प्रशासकीय गॅझेट निघाले आणि पंढरपूरकरांनी विश्वास ठेवला. एमआयडीसीच्या माध्यमातून भविष्यात मी अभियंत्यांची स्वप्ने पूर्ण करणार आहे.’ असे सांगून टाकळी-कासेगाव परिसरात पहिल्या टप्यात ५५ एकर आणि दुसऱ्या टप्यात ३५० एकरमध्ये एम.आय.डी.सी. उद्योग सुरु होत असून अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी ही ‘गुड न्यूज’ आहे. म्हणून ध्येय गाठण्यासाठी रडायचं नाही लढायचं! पाया भक्कम करताना आपल्या ध्येयावर फोकस करून प्रामाणिक पणे संघर्ष करत रहा.’ असे सांगून आमदार समाधान आवताडे यांनी ‘संघर्षा’ची व्याख्या उलगडली.