संशोधन कार्यात विद्यार्थ्यांचा सहभाग अत्यावश्यक
- वैज्ञानिक डॉ.बी. सत्यनारायण
स्वेरीमध्ये ‘पहिला राष्ट्रीय अंतराळ दिन २०२४’ साजरा
पंढरपूर- ‘इस्रोच्या ‘चांद्रयान-३’ या ऐतिहासिक मोहीमेमुळे जगाबरोबरच भारतातील युवा संशोधकांच्या मानसिकतेत सकारात्मक बदल घडला आहे. नवअभियंते व विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत आणि स्वप्नांच्या पुर्ततेसाठी परिश्रम घ्यावेत. देशाच्या अंतराळ संशोधनामध्ये योगदान देण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रेरित असणे गरजेचे आहे. एकूणच संशोधन कार्यात विद्यार्थ्यांनी सहभाग घेणे व त्यायोगे देशाच्या विकासाला हातभार लावणे अत्यावश्यक आहे.’ असे प्रतिपादन टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, मुंबई येथील प्रख्यात वैज्ञानिक अधिकारी डॉ.बी. सत्यनारायण यांनी केले.
आयट्रिपलई, आयआयसी आणि एलाइट फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये ‘पहिला राष्ट्रीय अंतराळ दिन २०२४’ मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. याप्रसंगी वैज्ञानिक अधिकारी डॉ.बी. सत्यनारायण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे हे होते. ‘नवोपक्रमाची जोपासना: भारतीय विद्यार्थ्यांना सशक्त करण्यामध्ये इस्रोची भूमिका’ या विषयावर वैज्ञानिक अधिकारी डॉ.बी. सत्यनारायण यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यामध्ये स्पर्धात्मक कार्यक्रम, पोस्टर सादरीकरण आणि मॉडेल सादरीकरण यामधून विद्यार्थ्यांनी सर्जनशीलता व तांत्रिक कौशल्ये प्रदर्शित केली. या स्पर्धांचे परीक्षण आशिष माकडेय यांनी केले. या उपक्रमाने केवळ भारताच्या अंतराळ क्षेत्रातील कामगिरीचाच सन्मान केला नाही, तर विद्यार्थ्यांमध्ये या अद्ययावत आणि सतत विकसित होणाऱ्या क्षेत्रात करिअर करण्याचा उत्साह निर्माण केला. अध्यक्षीय भाषणात स्वेरीचे संस्थापक सचिव व स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी ‘विद्यार्थ्यांनी अंतराळ क्षेत्रातील नोकरीच्या संधीचा फायदा घेवून राष्ट्राच्या विकासासाठी भरीव योगदान द्यावे.’ असे आवाहन केले. स्वेरीमध्ये ‘पहिला राष्ट्रीय अंतराळ दिन २०२४’ उत्साहात आणि विविध उपक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात आला. मॉडेल सादरीकरण या उपक्रमामध्ये राधिका कालिदास आटकळे आणि पोस्टर सादरीकरण मध्ये साक्षी धनाजी शिंदे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात आली. उपप्राचार्य डॉ. मिनाक्षी पवार त्यांच्या नेतृत्वाखाली व विभागातील इतर प्राध्यापकांच्या सहकार्याने हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी डॉ. हर्षवर्धन रोंगे, डॉ.सुमंत आनंद यांच्यासह इतर प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. एस.एस. गावडे आणि प्रा. एस.आर.वाघचवरे यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन डॉ. नीता कुलकर्णी आणि श्री. दिवाकर नळे यांनी केले तर विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. महेश मठपती यांनी आभार मानले.