*नागरिकांच्या गैरसोयीचे अप्पर तहसील कार्यालय रद्दच होणार - खा. धनंजय महाडिक*
*अप्पर तहसील कार्यालय कुरुल अथवा कामती येथेच होणार - खा. धनंजय महाडिक*
मोहोळ तालुक्यातील अनगर येथे शासनाने हजारो नागरिकांच्या गैरसोयीचे मंजूर केलेले अप्पर तहसील कार्यालय त्वरित रद्द करावे यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना भेटून देणार असल्याची माहिती राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. मोहोळ तालुक्यातील जनभावनेचा सन्मान करत तात्पुरते स्थगिती आदेश न देता प्रस्तावित अप्पर तहसील शासन निर्णय त्वरित रद्द करावा यासाठी पाठपुरावा सुरु असल्याचं देखील त्यांनी सांगितले.
अनगर हे तालुक्यातील शेवटचे गाव असल्यामुळे पाटकुल, पेनूर, आष्टी, शेटफळ, नरखेड या भागातील नागरिकांना येणे जाणे गैरसोयीचे आहे. तसेच पेनूर पाटकूल भागातील नागरिकांना दोन हायवे ओलांडून जाणे अडचणीचे आहे. नरखेड भागातील लोकांना सीना नदी पार करून जाणे देखील अडचणीचे आहे. त्यामुळे हे अप्पर तहसील कार्यालय त्वरित रद्द करण्यात यावे, याबाबतचे निवेदन देऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे सदर निर्णय रद्द होईपर्यंत पाठपुरावा करणार असल्याची माहिती खासदार महाडिक यांनी दिली. आमदार यशवंत माने व माजी आमदार राजन पाटील यांच्या बालहट्टाने राज्य शासनाने मंजूर केलेले अप्पर तहसील निर्णयाविरोधात तीव्र जनभावना आहे.
तात्पुरती स्थगिती देऊन फेर अहवाल सादर करण्याचं नाटक करून प्रशासनाला हाताशी धरून व तालुक्यातील विविध ग्रामपंचायत मधील सत्तेचा गैरवापर करत पुन्हा तोच प्रस्ताव दाखल करण्याचे कटकारस्थान जर काही लोक करू पाहत असतील तर त्यांचा तो डाव यशस्वी होऊ दिला जाणार नाही. हराळवाडी, कोरवली, बेगमपूर, वटवटे या दक्षिण भागातील लोकांना ज्याप्रमाणे मोहोळ पोलीस स्टेशन २५ कि मी लांबच्या अंतरावर पडत असल्यामुळे कामतीला जसे शासनाने पोलीस स्टेशन चालू केले त्याच पद्धतीने कुरुल-कमती याच भागाचा अप्पर कार्यालयावर पहिला अधिकार आहे.
*अप्पर तहसील कार्यालय कुरुल अथवा कामती येथेच होणार - खा. महाडिक*
हराळवाडी, कोरवली, बेगमपूर , वटवटे या दक्षिण भागातील लोकांना मोहोळ पोलीस स्टेशन २५ कि मी लांबच्या अंतरावर पडत असल्यामुळे कामतीला जसे शासनाने पोलीस स्टेशन चालू केले. जसे पोलीस स्टेशन झाले आहे त्या पद्धतीने अप्पर तहसील कार्यालयही याच भागात व्हावे ही आमची मागणी असल्याचे धनंजय महाडिक यांनी सांगितले.