स्वेरीकडून आषाढी वारी निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन आज वारीपूर्व स्वच्छतेचा निर्मल वारी - हरित वारी हा उपक्रम संपन्न

 


स्वेरीकडून आषाढी वारी निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन 


आज वारीपूर्व स्वच्छतेचा निर्मल वारी - हरित वारी हा उपक्रम संपन्न 



पंढरपूर- आषाढी एकादशी बरोबरच इतर महत्वाच्या तीनही मोठ्या वाऱ्यांमध्ये स्थापनेपासूनच स्वेरीचे योगदान राहिलेले आहे. पंढरीत वारीनिमित्त परंपरेनुसार संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर माऊली, संत सोपान काका, संत मुक्ताबाई, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, संत नामदेव महाराज, संत जनाबाई, संत गोरोबा काका (गोरा कुंभार), संत सेना महाराज अशा अनेक संतांच्या मानाच्या पालख्या पंढरीत येत असतात त्यामुळे पंढरीत वारकऱ्यांची मांदियाळी भरते. वारकऱ्यांच्या सेवेसाठी आरोग्य विभाग, स्थानिक प्रशासन, नगरपालिका व सुरक्षा बंदोबस्तासाठी पोलीस प्रशासन यांचाही मोठा ताफा असतो. यावेळी पंढरपुरातील गर्दीचे नियोजन करण्यासाठी तसेच वारकऱ्यांच्या सेवेसाठी स्वेरीकडून प्रशासनास सहकार्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. यावर्षीही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग, स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, पंढरपूर (ऑटोनॉमस), स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, (पॉलिटेक्नीक), पंढरपूर स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसी, पंढरपूर व स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसी (पॉलिटेक्नीक), पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वच्छ वारी-स्वस्थ वारी-निर्मल वारी-हरित वारी -आषाढी वारी २०२४’ चे आयोजन केले गेले आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून आज वारी पूर्व स्वच्छतेचे गोपाळपुरात आयोजन करण्यात आले होते. स्वेरीच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. 

        यंदाच्या आषाढी वारीच्या अगोदरच स्वेरीतर्फे वारकऱ्यांच्या स्वागतासाठी व सेवेसाठी वारीपुर्व स्वच्छता अभियान राबविण्यात आले आहे. गोपाळपूर (ता. पंढरपूर) ते मध्यप्रदेश भवन या दरम्यान साधारण दोन किलोमीटरचा दुतर्फा परिसर स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग व कॉलेज ऑफ फार्मसीच्या राष्ट्रीय सेवा योजनेतील तब्बल १८० विद्यार्थ्यांनी दोन तासात चकाचक केला. गोपाळपूर चौकात या स्वच्छता मोहिमेचे उदघाटन झाले. यावेळी गोपाळपूरचे सरपंच अरुण बनसोडे, उपसरपंच बाळासाहेब आसबे, संस्थेचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांच्यासह मान्यवरांनी ‘वारीचे महत्व व वारकऱ्यांची मनोभावे सेवा’ यावर बहुमोल भाष्य केले. सर्व ग्रामस्थ, स्वेरीचे शिक्षकवर्ग, विद्यार्थी यांनी हातात झाडू, खराटा, टोपली, खोरे आदी साहित्य वापरून स्वच्छता मोहीम राबविली. स्वेरीचे विद्यार्थी तहानभूक हरवून स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते. स्वेरीच्या चिन्हाने अंकित असलेल्या पांढऱ्या रंगाचे टी शर्ट परिधान केलेले विद्यार्थी व शिक्षक स्वच्छता करत असताना भाविकांनी पाहण्यासाठी गर्दी केली होती. संस्थेचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम. पवार, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ.एम.एस. मठपती, प्रथम वर्ष इंजिनिअरींगचे विभागप्रमुख डॉ. यशपाल खेडकर, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. रविकांत साठे, डॉ. एम. एम. आवताडे, प्रा. एस.बी. खडके, प्रा. बी.टी. गडदे, प्रा.जी.जी. फलमारी, प्रा.पी. व्ही. पडवळे, प्रा.एम.ए.सोनटक्के, प्रा. एस. डी. माळी, फार्मसीचे प्रा. एच.बी.बनसोडे, इतर प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी हे आता वारीच्या काळात, तीर्थ क्षेत्र पोलीस मदत केंद्र, पिण्याच्या शुद्ध पाण्याचे वाटप, पोलीस मित्र, निर्मल वारी, स्वेरीतील ग्रामीण मानव संसाधन विकास केंद्र (आर.एच.आर.डी.एफ.) च्या माध्यमातून शेतकरी असलेल्या वारकऱ्यांना बी-बियाणे, नवीन तंत्रज्ञान, अवजारे आदीची माहिती देवून वारकऱ्यांची सेवा केली जाणार आहे. आज पार पडलेल्या ‘वारीपूर्व स्वच्छता मोहिमे’च्या उदघाटन प्रसंगी उदय पवार, विक्रम आसबे, अजय जाधव, बापू लेंगरे, दामाजी कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक साळुंखे, यांच्यासह नागरिक व वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad